– आई, वडिलांसह पंधरा जणांवर गुन्हा
पिंपरी – 19 वर्षीय तरुणीचा 46 वर्षीय शिक्षकाशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याचा प्रकार सांगवी उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरूणीने आपल्या आई-वडिलांसह पंधरा जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विशेष म्हणजे पहिले लग्न झाले असताना केवळ मुलगा हवा म्हणून शिक्षकाने दुसरे लग्न केल्याचे समोर आले आहे.
सांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी याबाबत माहिती दिली. दिप्ती गायकवाड (वय-19, रा. जुनी सांगवी) या तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती उत्तम काळे याच्यासह आई अनिता गायकवाड (वय-36), वडील दयानंद गायकवाड (वय-46) तसेच मामा, काळे याची पहिली पत्नी आणि इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या शोधासाठी सांगवी पोलिसांचे एक पथक धाराशिव येथे रवाना झाले आहे. दिप्ती ही सांगवी येथे एका महाविद्यालयात कला शाखेत पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. आरोपी उत्तम काळे हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून त्याचे पहिले लग्न झाले आहे. तसेच त्याला चौदा वर्षाची मुलगी आहे. मुलगा हवा म्हणून त्याने दिप्तीशी दुसरे लग्न करण्याचा घाट घातल्याचे समोर आले आहे.
दीप्तीच्या आई-वडीलांनी तिचे लग्न तिला न विचारता ठरवले. ते तिला मान्य नव्हते. दीप्तीने नवऱ्या मुलालाही पाहिलेले नव्हते. स्थळ आहे म्हणून तुला लग्न करायचे आहे, असे सांगून तिला जबरदस्तीने गाडीत बसवुन तेरखेड येथे नेले. तिथे पती म्हणून उत्तम काळे याला दाखविले. नवरा मुलगा मोठा दिसतो व त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्यास चौदा वर्षाची मुलगी आहे, हे समजल्याने दीप्तीने आपण त्याच्याशी लग्न करणार नाही, असे आई-वडिलांना स्पष्ट सांगितले. त्यावेळी एका आरोपीने तो तुझ्या आई – वडिलांना पुण्यामध्ये फ्लॅट घेऊन देणार आहे. तसेच तो शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार दिल्यास तुला बघून घेईल, अशी धमकी दिली. 22 मार्च 2018 रोजी दीप्तीला आळंदी येथे नेऊन जबरदस्तीने लग्न लावून दिले. 20 एप्रिल रोजी दीप्तीने सांगवी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा