तरुणाईचा समाजोपयोगी “गणेशनगर मॉर्निंग वॉक’

रहाटणी – सुट्टीचा दिवस सत्कारणी लावण्याचा संकल्प केलेल्या थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेशनगर मॉर्निंग वॉक करण्यात आला. या उपक्रमांतर्गत खड्डे बुजवणे, झाडे व खांबावरील अनधिकृत जाहिराती काढून विद्रुपीकरण थांबवणे, गतिरोधक दर्शक फलक व्यवस्थित करणे, अशी कामे तरुणांनी केली.

ही मोहीम सकाळी साडेसात वाजता गणेश मंदिरापासून सुरू करण्यात आली. या ठिकाणी असलेल्या गतिरोधक दर्शक फलकाचा अँगल पूर्णपणे वाकून तो रोडमध्ये आला होता, तसेच गतिरोधकाजवळ पावसामुळे एक मोठा खड्डा तयार झाला होता. यामुळे या ठिकाणी खूप अपघात होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे सर्वप्रथम वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा ठरणाऱ्या व अपघाताला निमंत्रण देणाऱ्या समस्येचे तरुणांनी निराकारण केले. कार्यकर्त्यांनी अँगल सरळ करून विटांचा चुरा करून व ब्लॉक टाकून खड्डा बुझवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेश नगरमधील लोकमान्य कॉलनी, दुर्गा कॉलनी व मयूर बाग कॉलनी या ठिकाणी फिरुन रोडवरील विद्युत दिव्यांच्या खांबावरील आणि महा-वितरणच्या डीपीवरील अनधिकृत जाहिराती काढल्या. आपले थेरगाव सुंदर दिसावे या उद्देशाने सर्व स्टिकर्स, फ्लेक्‍स, काढून विद्युत खांब, डीपी जाहिरात मुक्‍त करण्यात आले. त्याचबरोबर नगरातील झाडांवरील बोर्डस्‌, खिळे, तारा, स्टेपलरच्या पिन्स, बाइंडिंग वायर्स काढून झाडांना खिळेमुक्‍त करण्यात आले. तसेच शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात आणि झाडांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात नागरिकांना जागरूक व सजग राहण्याचे आवाहन केले.
गणेश नगरचे प्रवेशद्वार गणेश मंदिराजवळील नेहमीच होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी अतिशय डोकेदुखीचा विषय ठरली आहे. यावर तोडगा म्हणून फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या परिसरातील व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडून लावण्यात येणाऱ्या गाड्या चुकीच्या पद्धतीमुळे लावल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे समजावून सांगितले. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने गाडी वाहतुकीस अडथळा होणार नाही, या उद्देशानेच लावली पाहिजे व ही सर्वस्वी जवाबदारी विक्रेत्यांनी न चुकता स्वतःहून घ्यायला हवी, असे सांगितले. यावेळी मंदिराजवळील रिक्षा संघटना व ज्येष्ठ नागरीक यांना मार्गदर्शन करण्यात आले.

अनिकेत प्रभू, राहुल सरवदे, निलेश पिंगळे, अनिल घोडेकर व सुशांत पांडे यांनी गणेशनगर वॉक उपक्रमाचे आयोजन केले होते. फाउंडेशनतर्फे राहुल जाधव, जनक क़सबे, अंकुश कुदळे, प्रशांत चव्हाण, मयूर गुंडगळ, मयूर कांबळे, प्रकाश गायकवाड, शंतनू तेलंग, शेखर गांगर्डे, स्वप्निल मंडल, अमोल शिंदे, रोहित ढोबळे, अभिजित खानविलकर, तुषार कांबळे, सचिन क्षीरसागर, दशरथ रणपिसे, दत्ता एरंडे, बापू खोसे, महेश येळवंडे, संकेत निकम, सुरज जोशी, पंकज पाटील, आनंद जाधव यांनी उपक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)