तमाशा पंढरीत “सुपारी’साठी राहुट्यांमध्ये रेलचेल

नारायणगावात 100 तमाशा कार्यक्रमांचे “बुकिंग’ ः दीड कोटींची उलाढाल

नारायणगाव – लोकनाट्य तमाशा फड मालकांच्या दृष्टीने गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. या दिवसाचे औचित्य साधून नारायणगाव येथील तमाशा पंढरीत संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रातील पंच कमिटी, गावकारभाऱ्यांची जत्राच भरली होती. आपल्या गावातील तमाशाची सुपारी (बुकिंग) देण्यासाठी सर्व राहुट्यांमधून रेलचेल चालली होती. दिवसभरात सुमारे 100 तमाशा कार्यक्रमांच्या सुपाऱ्या जाऊन साधारणपणे आजच्या दिवशी सुमारे 1 कोटी 50 लाखांची उलाढाल या तमाशा पंढरीत झाली, अशी माहिती तमाशा फड मालक अविष्कार पप्पू मुळे, मोहीत सावंत नारायणगावकर, संभाजीराजे जाधव, किरण ढवळपुरीकर यांनी दिली. दरम्यान या वर्षीही बैलगाडा शर्यतीवर बंदी, आचारसंहिता व दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने याचा फटका देखील तमाशा फड मालकांना बसल्याचे दिसून येत होते.

नारायणगाव येथील मीना नदीच्या पात्रालगत असलेल्या वेताळबाबा मंदिराजवळ असलेल्या शेतजमिनीत सुमारे 3 एकर क्षेत्रात राहुट्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक फड मालकांना दिवसभरात 6 ते 7 सुपाऱ्या मिळाल्या, सर्वच फड मालकांच्या दृष्टीने पौर्णिमा, कालष्टमी या दिवसांना विशेष महत्त्व असून, या तारखांना लोकनाट्य तमाशा खेळाची सुपारी सर्वाधिक किंमतीची मिळते. लोकनाट्य तमाशाचे सुपारी देण्यासाठी पुणे, नगर, नाशिक, सातारा, फलटण ठाणे आदी ठिकाणचे ग्रामस्थ, गावकरी, पंच कमिटी, यात्रा उत्सव कमिटी, पुढारी यांची नारायणगावच्या तमाशा पंढरीत गर्दी झाली होती. तमाशात कलाकार किती, महिला कलावंत किती, वग कोणता, गावी किती होणार याची प्रामुख्याने विचारणा गाव पुढ-यांकडून होत होती. कालाष्टमी व पौर्णिमा या दिवसासाठी तमाशा खेळाला जास्त मागणी होती. नारायणगाव ग्रामस्थ व मुक्ताबाई ट्रस्टचे कमिटी सदस्य यांच्या सहका-र्याने राहुटयांसाठी मोफत जागा नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आषिश फुलसुंदर, सुरेश पवार, मारूती फुलसुंदर, शरद फुलसुंदर, गणेश गाडेकर यांच्या मालकीच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत .

  • तुकाराम खेडकर यांसह पांडुरंग मुळे यांची पौर्णिमा 2 लाख 91 हजार आणि कालष्टमी 2 लाख 75 हजार तर मंगला बनसोडे यांची पौर्णिमा 2 लाख 85 हजारास, रघुवीर खेडकर यांची पोर्णिमा 2 लाख 65 हजार, चंद्रकांत ढवळपुरीकर यांची पौर्णिमा सुपारी 2 लाख 41 हजारास, भिका-भीमा सांगवीकर यांची पौर्णिमा 2 लाख 65 हजारास, आनद लोकनाट्य पौर्णिमा सुपारी 2 लाख 25 हजार गेली. मध्यम स्वरूपाच्या व छोट्या तमाशा फड यांच्या सुपाऱ्या 1 लाख 35 हजार ते 1 लाख 75 हजारानच्या दरम्यान गेल्या.
    – अविष्कार मुळे व संभाजी जाधव, अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष
  • आचारसंहितेचाही फटका
    या वर्षी बैलगाडा शर्यतीवर बंदी व आचारसंहिता याचा फटका देखील फड मालकांना बसल्याचे दिसून येत होते. 2019 लोकसभेची आचारसंहिता मुळे 10 वाजताच तमाशा खेळ बंद करावा लागतो, शासनाने तमाशा खेळ उशिरा पर्यंत सुरु ठेवावेत यासाठी आदेश काढलेला आहे. मात्र पोलीस प्रशासन मात्र आदेशाला जुमानत नाही. अनेक गावात रात्री 12 नंतर तमाशा वग सुरू होतात आणि पहाटेपर्यंत चालतात; परंतु वेळेचे बंधन आल्याने त्याचा परिणाम तमाशा बुकिंगवर झाला आहे, वेळेच्या बंधनामुळे अनेक गावांतील नागरिक लोकनाट्य तमाशा खेळाच्या बुकिंगला आलेले नाही, पौर्णिमा, कालाष्टमी, नवमी अशा तारखांना विशेष करून तमाशा खेळाला मागणी असते.
  • यंदा तमाशा फडाच्या34 राहुट्या
    नारायणगाव तमाशा कला पंढरीमध्ये लोकनाटय तमाशा फडाच्या 34 राहुट्यांचे आहेत. फडांमध्ये यंदाच्या वर्षी तमाशा पंढरीत विठाबाईभाऊ मांग नारायणगावकर, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, मालती इनामदार, हरिभाऊ बढे यांसह शिवकन्या बढे नगरकर, राजेश गणेश सांगवीकर, चंद्रकांत ढवळपूरीकर, किरणकुमार ढवळपूरीकर, भिका भिमा सांगवीकर, अमन तांबे, संध्या माने, आनंद जळगावकर, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ, कुंदा पाटील पुणेकर, शांताबाई सम्रापूरकर, प्रकाश अहिरेकर, जगनकुमारसह हौसा वेळवंडकर, मनीषा सिध्देटेककर, बाळ आल्हाट नेतवडकर, छाया खिलारे, ईश्वर खिलारीकर, रामचंद्र वाडेकर, काळू-नामू येळवंडकर, स्वाती शेगावंकर, वामन पाटोळे, दत्ता महाडिक पुणेकर, गेनभाऊ आंबेठाणकर आदी तमाशा फडाच्या राहुट्या उभारण्यात आलेल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.