तब्बल 36 वर्षांचा दुष्काळ संपणार?

महिला हॉकी संघाकडून सुवर्णाचीच अपेक्षा

जकार्ता – भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडास्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना गेल्या 20 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली. आता उद्या (शुक्रवार) होणाऱ्या अंतिम सामन्यात जपानवर मात करून गेल्या 36 वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याची त्यांना संधी आहे. विश्‍वक्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेला भारतीय महिला हॉकी संघ हा आशियाई क्रीडास्पर्धेतील सर्वोच्च मानांकित संघ आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने अत्यंत चुरशीच्या उपान्त्य सामन्यात चीनवर 1-0 अशी निसटती मात करताना दोन दशकांनंतर आशियाई हॉकी स्पर्धेतील महिला हॉकीच्या अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपान्त्य लढतीत जपानच्या महिला संघाने गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या महिला हॉकी संघाचा 2-0 असा पराभव करताना खळबळजनक निकालासह अंतिम फेरी गाठली.

भारतीय महिलांनी याआधी 1998 मधील बॅंकॉक आशियाई क्रीडास्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु त्या वेळी कोरियाकडून पराभूत झाल्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या वेळी मात्र भारतीय महिलांना निश्‍चितपणे सुवर्णपदकाची संधी आहे. भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडास्पर्धेतील आपले एकमेव सुवर्णपदक नवी दिल्लीतील स्पर्धेत 1982 मध्ये मिळविले होते. त्यानंतर त्यांना सोनेरी यशाने हुलकावणीच दिली आहे. मात्र यंदाचा संघ पाहता भारतीय महिलांना ही कोंडी फोडता येईल असा जाणकारांचा अंदाज आहे.

एक तर यंदाच्या स्पर्धेत भारतीय महिला संघ आतापर्यंत अपराजित आहे. तसेच त्यांनी आपल्या बहुतेक प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फड़काने विजय मिळविले आहेत. भारतीय महिला संघाने इंडोनेशियाचा 8-0 असा धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. त्यानंतर कझाखस्तानचा 21-0 असा फडशा पाडल्यावर त्यांनी कोरियाचे आव्हान 4-1 असे मोडून काढले. अखेरच्या गटसाखळी लढतीत थायलंडचा 5-0 असा एकतर्फी पराभव केल्यानंतर भारतीय महिलांनी उपान्त्य लढतीत चीनवर मात केली. भारतीय महिलांच्या बचावफळीची कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे. दीप ग्रेस एक्‍का, दीपिका, गुरजित कौर, सुनीता लाकरा व नवोदित रीना खोखर यांनी बचावफळीत अफलातून कामगिरी करताना प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमणफळीला रोखले आहे. जपानविरुद्धची अंतिम लढत चुरशीची होईल. परंतु आमची बाजू सरस असून आम्ही बचाव व आक्रमणात आतापर्यंतची कामगरिी कायम राखली, तरी जपानवर जिय मिळविणे कठीण नाही, असे सांगून भारतीय कर्णधार राणी रामपाल म्हणाली की, वंदना कटारिया व गुरजित कौर यांचा फॉर्म निर्णायक ठरू शकेल. आम्ही पाच सामन्यांत 39 गोल केले असून जपानवर दडपण राखण्यासाठी ही गोलसंख्या महत्त्वाची ठरेल. त्यामुळे जपानची बचावफळी सातत्याने दबावाखाली राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)