तगाडेवाल्यांची “दादागिरी’

  • हातगाड्यांचे मालकच नगरसेवक : कारवाई कशी होणार?

दीपक पडकर
जळोची – बारामती शहरात रस्ते आणि फुटपाथवर हातगाडेधारकांनी दादागिरीने अतिक्रमण केले आहे. हातगाड्यांचे मालकच नगरसेवक असल्याने कारवाई कोणावर करू? नागरिकांच्या हितासाठी अतिक्रमण काढणे गरजेचे आहे, मात्र नगरसेवकांचे अतिक्रमण या दुहेरी संकटात अतिक्रमण विभाग सापडला असल्याने ठोस कारवाई होत नाही.
नगर पालिकेने शहरातील अतिक्रमणांवर कारवाई केली खरी, परंतु कारवाईनंतर अतिक्रमणांचे अवशेष मात्र जागेवरच ठेवले. सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अतिक्रमण विरोधी कारवाई करताना हस्तक्षेप केला. तर काही हातगाडेधारकांचे मालक स्वतः आजी-माजी नगरसेवक आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ, एमआयडीसी, तर उपनगरात नवीन भागात नगरसेवकांच्या तडजोडीने पुन्हा त्याच ठिकाणी तर काही नवीन ठिकाणी अतिक्रमण उभी राहिली आहेत. बारामती शहरात व उपनगरात 2016 च्या सर्वेक्षणानुसार फक्‍त 1122 हातगाडे व फेरीवाले आहेत. मात्र प्रत्यक्ष यांचा आकडा तिप्पट झाला असल्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. नगरसेवकांनी परप्रांतीय कामगारांना कामावर ठेऊन त्यांना कायम रहिवासी असल्याचे दाखवून मुख्यबाजार पेठ व फुटपाथ ताब्यात घेतले आहे. नागरिकांना जीव धोक्‍यात घालून रस्त्यावर चालावे लागते. याबाबत तीव्र शब्दांत नाराजीचा सुरू आहेत. याबाबत स्थानिक नागरिक भविष्यातील निवडणुकीच्या काळात अशा आडदांड नगरसेवकांना घराचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही.

  • हॉकर्स झोनला मूहुर्त मिळेना
    एमआयडीसी, भिगवण रोड, इंदापूर रोड, सिनेमा रोड, कचेरी रोड, गुणवडी चौक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर तसेच दुकानांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली. अतिक्रमणांमुळे या भागातील रहिवाशांचा व येणाऱ्या नागरिकांचा गुदमरलेला श्‍वासही त्यामुळे मोकळा झाला होता. मात्र सत्ताधारी नगरसेवक व विरोधकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केल्याने हतबल प्रशासनाने एक दिवसातच अतिक्रमण मोहीम बंद केली. तर प्रशासनाला हॉकर्स झोनबाबत निर्णय घेण्यास मूहुर्त मिळत नाही.
  • व्यापारी झाले फुटपाथचे मालक
    प्रशासनाच्या डोळ्यांदेखतच फुटपाथवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच असून शहर अतिक्रमणाच्या विळख्यातच जखडले गेले आहे. शहरातील रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोरील फुटपाथवर काही रुपयांच्या भाड्यापोटी फळ, भाजी, कपडे आदी विक्रेत्यांनी आपली अनधिकृत स्टॉल लावली आहे. फेरीवाल्यामध्ये नगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा व काही नगरसेवकांचा समावेश आहे. पुनावला गार्डनच्या समोरील शहरातील चायनीजचे अनेक स्टॉल स्वतःच्या मालकीचा गाळा असतानाही रस्त्याकडेला लावतात त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या अनेक महिलांच्या छेडछाडीचे प्रकार यापूर्वीही घडले असताना मात्र, याबाबतीत प्रशासन गंभीरपणे घेत नसल्याने नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्‍त केली.

बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे हे खरे आहे. मात्र नगरसेवकांनी अतिक्रमण करणाऱ्यास पाठीशी घालणे हे योग्य नाही. नगरपालिका प्रशासन निष्क्रिय असल्याने पुन्हा अतिक्रमण होत आहे. याकडे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन पहिले पाहिजे.
– अनिल काळे, नागरिक, बारामती

हॉकर्स झोनची समिती तयार करण्यात आली आहे. लवकरच हॉकर्स झोनची निर्मिती करण्यात येईल. सर्व फुटपाथ लवकरच अतिक्रमणमुक्‍त करू.
– राजेंद्र सोनवणे, अतिक्रमण विभाग, प्रमुख, नगर पालिका

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)