ढोल-ताशांच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली

माऊलींच्या सर्जा-राजाची भव्य मिरवणूक : राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांचा उत्साह

आळंदी – माऊली माऊलीचा अखंड जयघोष… भंडाऱ्याची मुक्‍त उधळण… ढोल-लेझीम-ताशांचा गजर… भक्‍तिगीतांचा निनाद अन्‌ हजारो भाविकांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथास जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या सर्जा-राजाची शनिवारी (दि. 22) सकाळी प्रदक्षिणा मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा मंगळवारी (दि. 25) प्रस्थान ठेवणार असून बुधवारी (दि. 26) लाखो वैष्णवांसमवेत पालखी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. 22) हे सर्जा-राजा पालखीस जुंपण्यास वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय टीमने दिले त्याचबरोबर संपूर्ण पालखी सोहळ्यादरम्यान या सर्जा-राजाची तपासणी करण्यात येणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता आळंदीतील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मठातून फटाक्‍यांची आतषबाजीत सर्जा-राजाची प्रदक्षिणा मार्गाने हजारो आळंदीकर नागरिक तसेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सर्जा-राजाच्या मिरवणुकीचे ठिकठिकाणच्या चौकाचौकांत मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात येत होते. मिरवणूक माऊली मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच महाद्वारात येताच “पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’चा गजर करण्यात आला.
यानंतर महाद्वारात वाद्यांच्या मंगलमय वातावरणात पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, विश्‍वस्त विकास ढगे पाटील, मालक बाळासाहेब आरफळकर (पवार), प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर, पुजारी राजाभाऊ चौधरी, राजाभाऊ चोपदार यांच्या उपस्थितीत सर्जा-राजाच्या यंदाचे मानकरी रानवडे परिवाराचा शाल, श्रीफळ व माऊलींची प्रतिमा देऊन यथोचित असा सन्मान करण्यात आला.

यावेळी आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, राहुल चिताळकर, नगरसेवक तुषार घुंडरे, माजी उपाध्यक्ष रामदास भोसले, विलास घुंडरे, संतोष राजेभोसले, माऊली गुळूंजकर, अजित मधवे, माऊली घुंडरे, बाबाजी कुराडे, भीमराव घुंडरे, माऊली दिघे, आकाश जोशी, गणपत घुंडरे व बैल जोडीचे मानकरी संपूर्ण रानवडे परिवार व भाविक उपस्थित होते.

इंद्रायणी नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला
दरम्यान, पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी आळंदी नगरपरिषदेने सोयी, सुविधा पुरविण्यासाठी पावले टाकली असून गर्दीचा अंदाज लक्षात घेत इंद्रायणी नदीवरील सिद्धबेट बंधाऱ्यानजीकचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. येथील बाह्यवळण रस्ता व पूल जोड काम अंतिम टप्प्यात आहे. पालिकेने महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून इंद्रायणी हॉस्पिटल ते इंद्रायणी नदी, सिद्धबेट बंधाऱ्यापर्यंतचा अंदाजे एक किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता पूर्ण झाला असून या रस्त्याला जोड असणारा इंद्रायणी नदीवरील पूलदेखील पूर्ण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.