ढाकणे, राजळेंचे सहायक निबंधक कार्यालयासमोर धरणे

पाथर्डी खरेदी-विक्री संघात 52 लाख रुपयांचा गैरव्यवहार
पाथर्डी – तालुका खरेदी-विक्री संघाने उभारलेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामामध्ये 52 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, यात दोषी असलेल्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, संघाचे व्यवस्थापक बारवकर यांच्या काळातील सर्व व्यवहार रद्द करावेत, तसेच बाजार समितीच्या आवारात आमदार राजळे समर्थकाने केलेले अतिक्रमण तातडीने काढावेत, या मागणीसाठी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निबंधक कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
येत्या 15 दिवसांत कारवाईला सुरुवात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रभारी सहायक निबंधक अधिकारी अनिल भांगरे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या कारभारावरून आमदार मोनिका राजळे व प्रताप ढाकणे गटात सुप्त राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. मागील आठवड्यात ढाकणे गटाच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या कामकाजावरून राजळे समर्थकांनी सहायक निबंधक कार्यालयात धरणे आंदोलन केले, तर आज राजळे गटाच्या ताब्यात असलेल्या संघाच्या कामकाजावरून ढाकणे यांनी प्रतिधरणे आंदोलन करीत राजळे यांना खिंडीत गाठले.
या आंदोलनात ढाकणे, शिवशंकर राजळे यांच्यासह बाजार समितीचे सभापती बन्सी आठरे, संचालक वैभव दहिफळे, बाळासाहेब घुले, संघाचे माजी संचालक सीताराम बोरुडे, चांद मणियार, चंदू भापकर, पंढरीनाथ आठरे, डॉ. राजेंद्र खेडकर, रामराव चव्हाण, देवा पवार, योगेश रासने, अनंत ढोले, रामराव पोटे, वकील गुलाब राजळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी आपल्या भाषणातून स्व. राजीव राजळे व राजळे गटाच्या ताब्यात असलेल्या दूध संघ, खरेदी-विक्री संघ व वृद्धेश्वर कारखान्याच्या कारभारावर टीकेची चांगलीच तोफ डागली. या वेळी बोलताना प्रताप ढाकणे म्हणाले, “”माझ्या ताब्यात असलेल्या केदारेश्वर कारखान्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वय 58 झाल्यानंतर आपण दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. मात्र, राजळे यांनी जिल्हा बॅंकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची नेमणूक संघाच्या व्यवस्थापकपदी करून नियमांना हरताळ फासला. आमच्या ताब्यात समितीची सत्ता आल्याने व ती नफ्यात आल्याने राजळे यांना पोटदुखी झाली आहे. सत्तेच्या माध्यमातून केलेले पाप दडविण्याचा ते प्रयत्न करीत असून, राजीव राजळे हे आपले मित्र होते. त्यांचे वर्षश्राद्ध झाल्याशिवाय आपण काहीच बोलणार नव्हतो. मात्र, विनाकारण आपल्यावर आरोप केले गेल्याने आंदोलन करत आहोत. राजळे यांच्या समर्थकाने समितीच्या आवारात अतिक्रमण केले असून ते तातडीने काढण्यात यावे. संघाच्या मालकीच्या मंगल कार्यालयाच्या बांधकामात 52 लाख 56 हजार 874 रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत व संघाच्या व्यवस्थापकपदी असलेल्या बारवकर यांच्या काळातील सर्व व्यवहार रद्द करण्यात यावे,” अशी मागणी करत शिवशंकर राजळे हे आपले आजपासून लहान भाऊ असल्याचे त्यांनी घोषित केले.
शिवशंकर राजळे म्हणाले, “”जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संघाच्या मालकीच्या डिझेल पंपावरून फुकट डिझेल वाटप करण्यात आले. राजळेंच्या ताब्यात असलेल्या सर्व संस्थांमध्ये मोठा गैरव्यवहार चालू असून ढाकणे यांच्या ताब्यात असलेली संस्था नफ्यात आल्याने त्यांना पोटदुखी झाली आहे. राजाभाऊ यांच्या निधनानंतर अनेकांना आपणच आता मालक झाल्याचे वाटत असून कोणीही उठतो अन्‌ कुणालाही काहीही आश्वासन देतो, अशी राजळे गटाची परिस्थिती झाली आहे. दूध संघातील गैरव्यवहारावरून राजीव राजळे यांना बेड्या पडल्या असत्या. मात्र, पंढरीनाथ आठरे यांना दूध संघाचे अध्यक्ष करतो, असे सांगून तक्रार मागे घ्यायला लावल्याने राजळे वाचले. कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, योग्य वेळी हे प्रकरण आपण बाहेर काढू,” असे सांगत त्यांनी संघामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
सहायक निबंधक अधिकारी कार्यालयातील एस. ए. कराळे यांनी मंगल कार्यालय बांधकामासंदर्भात अहवाल आलेला असून, त्यावर 15 दिवसांत कारवाई करण्यास सुरुवात केली जाईल. बारवकर यांच्या संदर्भात चौकशी केली जाईल, तसेच अतिक्रमणासंदर्भात बाजार समितीला योग्य निर्देश देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)