डोंगरगाव दरोड्यातील आरोपी जेरबंद

वृद्धाचा खून करून दोगिन्यांसह केला होता पोबारा

लोणी काळभोर-लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव (ता. हवेली) गावातील गडदेवस्तीवर सप्टेंबर 2018मध्ये दरोडा टाकताना एका वृद्ध व्यक्‍तीचा खून करून त्याच्या पत्नीचे साठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने एका आरोपीला जेरबंद केले आहे.
या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी अजय जयाश्या काळे (वय 21, रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला अटक करून लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संदर्भात मयत केरबा गडदे यांच्या स्नुषा निर्मला अशोक गडदे (वय 30, रा. गडदे वस्ती, डोंगरगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दाखल केली होती. त्या रात्री त्यांचे पती व एक मुलगा शेतात पाणी धरण्यासाठी गेले होते. दि. 17/09/18 रोजी पहाटे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हददीतील डोंगरगावच्या गडदेवस्तीवर केरबा भिवा गडदे यांच्या घराचा दरवाजा अनोळखी व्यक्‍तींनी उघडण्यास सांगून घरात प्रवेश केला. या वेळी केरबा गडदे (वय 65) यांच्या डोक्‍यात जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे ते मृत्यूमुखी पडले. त्यांच्या पत्नी मुक्ताबाई यांच्या नाकातील नथ व गळ्यातील मंगळसूत्र असा एकूण साठ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. मारहाणीचा आवाज ऐकून निर्मला गडदे जाग्या झाल्या व त्यांनी शेजाऱ्यांना मोबाईल फोन वरून चोर आल्याची माहिती दिली होती. हे पाहून तिघेही दरोडेखोर पळून गेले. या बाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला तपासाबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, राजू मोमीन, पोपट गायकवाड या पोलीस पथकाची नियुक्ती केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला अजय काळे हा शिरूर पाबळफाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याने नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दरोडा टाकल्याचे कबूल केले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

  • पिन्या काळेची टोळी
    हा गुन्हा पिन्या अंकुश काळे (रा. रांजणगाव मशिद) याच्या टोळीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याच टोळीतील अर्चना उदाशा भोसले व शेखऱ्या उदाशा भोसले या दोघांना याच गुन्ह्यातील सोन्याची नथ विकण्यासाठी शिरुर येथे आले असता ऑक्‍टोबर 2018 मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. पुढील तपास लोणी कंद पोलीस करीत आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)