डॉ. नामदेवशास्त्रींचा पुन्हा पंकजा मुंडेंवर निशाना

भगवानगडावरील वंजारी समाजाची बैठक शांतता भंग करण्यासाठीच
जिल्हा प्रशासनाला शास्त्रींचे निवेदन

पाथर्डी- संत भगवान बाबांच्या 122 व्या जयंतीचे निमित्त साधत भगवानसेनेने भगवानगडावर वंजारी समाजाच्या आरक्षण व आंदोलनासंदर्भात बोलाविलेली बैठक जाणीवपूर्वक व गडाची शांतता भंग करण्याच्या दृष्टीने केलेले कारस्थान आहे. दोन वर्षांपूर्वी पोलीस प्रशासनासहित, भाविकांना दसरा मेळाव्यानिमित्त कटू अनुभव आलेले आहेत. त्याच राजकीय शक्‍ती पुन्हा पुन्हा शांतता भंग करत आहेत, असा आरोप भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. या निवेदनातून शास्त्रींनी अप्रत्यक्षरीत्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. शास्त्री यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड शुक्रवारी (दि. 31)बाबांच्या जयंतीच्या दिवशी भगवानगडावर वंजारी समाजाच्या आरक्षण व आंदोलनासंदर्भात बैठक घेणार असल्याचे समजले. देवस्थान समितीची परवानगी न घेताच या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. यामागे मोठ्या राजकीय शक्‍तींचे कटकारस्थान आहे. मागेही पोलीस प्रशासनासह शासनाला दसरा मेळाव्यानिमित्त अनुभव आलेला आहे. त्याच शक्‍ती पुन्हा पुन्हा गडाची शांतता भंग करत आहेत. संत भगवानबाबांच्या 122 व्या जयंतीनिमित्त भगवानगडावर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.

या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अशा वेळी अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.दसरा मेळाव्यावरून मुंडे समर्थक व महंत समर्थकांत भगवानगडावर झालेला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त गडाच्या महंतांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनावरून दोन्ही समर्थकांमध्ये पुन्हा संघर्ष होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. राज्यातील वंजारी व बहुजन समाज एकत्र केला. मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविक उपस्थित राहत होते. ऊसतोडणी कामगारांच्या संपाबाबतची व आपल्या राजकीय वाटचालीची घोषणा मुंडे याच दसरा मेळाव्यातून करीत होते.

भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा मुंडे यांनी आपली राजकीय शक्‍ती वाढवण्यासाठी अत्यंत खुबीने उपयोग केला. वंजारी समाज व भगवानगडावरील दसरा मेळावा हे जणू समीकरणच बनले होते. मुंडे यांच्या दसरा मेळाव्याकडे देशातील राजकीय मंडळींचे लक्ष लागत होते. दसरा मेळाव्यात मुंडे काय राजकीय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागत असे.
मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडाच्या विश्‍वस्तांनी तेथे राजकीय भाषणबंदीचा निर्णय घेतला. मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे त्यामुळे दुःखावल्या. विश्‍वस्तांच्या निर्णयाने पंकजा यांना मोठा धक्‍का बसला. दोन वर्षांपूर्वी भगवानगडावरच्या दसरा मेळावावरून मुंडे-शास्त्री यांच्या कमालीचा संघर्ष झाला. दोन्ही समर्थकांत गडावर धुमश्‍चक्री झाली.

राज्याच्या राजकारणातही दसरा मेळाव्याचे पडसाद उमटले. पंकजा यांना प्रशासनाने भगवानगडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर कमालीचा तणाव निर्माण होऊन भगवानगडाला दसऱ्याच्या दिवशी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पंकजा यांनी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांची भगवानगडावरील मेळाव्याची परंपरा खंडित झाली. गेल्या वर्षी पुन्हा दसरा मेळावावरून शास्त्री-मुंडे यांच्यात संघर्ष झाला. पंकजा यांनी भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून निर्माण झालेली मुंडे-शास्त्री वादाची चर्चा संपुष्टात आली होती. संत भगवानबाबा यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त भगवानसेनेकडून घेण्यात येणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. शास्त्री यांनी पंकजा यांचा नामोल्लेख टाळत जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात बैठकीमागे मोठी राजकीय शक्‍ती असल्याचा आरोप केल्याने पुन्हा एकदा मुंडे व डॉ. शास्त्री यांच्यातील वादाची चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)