डॉ. दाभोलकर, गौरी लंकेश हत्येसाठी एकच पिस्तूल

न्यायालयात सीबीआयचा दावा : पिस्तूल बॅलेस्टिक रिपोर्टसाठी पाठवले

अंदुरेच्या पोलीस कोठडीत 30 ऑगस्टपर्यंत वाढ


हत्येपूर्वी तिघांनी रेकी केल्याचे तपासात निष्पन्न

पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेचा मेहुणा शुभम सुराळेच्या मित्र राजेश रेगे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलातूनच डॉ. दाभोलकर आणि जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. तर दोन्ही प्रकरणात अमोल काळे, अमित दिगवेकर यांच्यासह आणखी एकाने रेकी केल्याचा दावा गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी केला. दरम्यान, अंदुरे याच्या पोलीस कोठडीत 30 ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सचिन अंदुरे याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी केली. ते म्हणाले, “जप्त करण्यात आलेले पिस्तूल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून बॅलेस्टिक रिपोर्टनंतर दोन्ही गुन्ह्यात एकच पिस्तूल वापरण्यात आले का? हे स्पष्ट होणार आहे. गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील आरोपीने अंदुरेकडे 7.65 मिमी बोअरचे पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे दिले होते. अंदुरेला अटक होताच हे पिस्तुल लपविण्यात आले होते.’

दरम्यान, सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालामध्ये गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी ती गुन्ह्यात वापरल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. त्यांना सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याकडे एकाच वेळी तपास करायचा आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. प्रशांत साळशिंगीकर यांनी अंदुरेला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. ते म्हणाले, “अंदुरेच्या सीबीआय कोठडीत डॉ. दाभोलकरांच्या हत्याबाबत काहीच तपास झालेला नाही. सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात सारंग अकोलकर, विनय पवार यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे नमूद केले होते. जतनेचा रोष कमी करण्यासाठी नवीन “थिअरी’ मांडण्यात आली आहे.’

अंदुरेला भेटण्याची वकिलांना परवानगी
सीबीआय कोठडीत असनाता कुटुंबीय आणि वकिलांना सचिन अंदुरे याला भेटू दिले नाही, असा दावा अॅड. साळशिंगीकर यांनी केला. असे कृत्य करणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचे अवमान केल्यासारखे आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यांचा हा मुद्दा अॅड. ढाकणे यांनी खोडून काढला. दरम्यान, वकिलांना अंदुरे याला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली.

कोर्ट हॉलमध्ये मेहुणीने बांधली राखी
पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपल्याने दुपारी 1 च्या सुमारास अंदुरे याला सीबीआयने न्यायालयात हजर केले. सुनावणीवेळी त्याच्या जवळच्या काही व्यक्ती न्यायालयात आल्या होत्या. रविवारी रक्षाबंधन असल्याने अंदुरेच्या मेहुणीने न्यायालयाची परवानगी घेऊन कोर्ट हॉलमध्ये त्याला राखी बांधली. त्यावेळी अंदुरे याने तिच्याकडे कुटुंबीयांची चौकशी केली. कुटुंबीयांनी पाठवलेला ड्रेसदेखील सीबीआयच्या तपासणीनंतर त्याला देण्यात आला.

शरद कळसकरनेही गोळी झाडली : सीबीआय
डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात दुसरी गोळी झाडणारा हा शरद कळसकर असल्याचे सीबीआयच्या रिमांड अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. कळसकर हा सध्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीत असून त्याला मुुंबई येथील न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सीबीआयलाही शरद कळसकरचा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी ताबा हवा असून पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे, असे अॅड. विजयकुमार ढाकणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)