डॉ. कोल्हेंच्या रुपाने विकासाची कवाडे उघडी करू

  • काठापूर येथील सभेत दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन

लाखणगाव, दि. 16 (वार्ताहर) – 15 वर्षांपूर्वी निवडून येण्यासाठी खासदार आढळराव यांनी विकास आराखड्याचे मतदारांना गाजर दाखविले.त्यांनतर रेल्वे, विमानतळ, पुणे-नाशिक हमरस्ता होणार आहे. मला संधी द्या, असे म्हणून गेली 15 वर्षे मतदारांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा सारखा सुसंस्कृत, सुशिक्षित उमेदवाराला आपले बहुमुल्य मत देऊन विकासाची कवाडे उघडी करुया, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केले.
काठापूर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. कोल्हें प्रचारार्थ झालेल्या सभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी विष्णू हिंगे, विवेक वळसे-पाटील, बाळासाहेब घुले, शांताराम हिंगे, भगवान वाघ, प्रदिप वळसे, निलेश थोरात, विनायक करंडे, अनिल जाधव, अशोक करंडे, कान्हु करंडे, विठ्ठल टिंगरे, देवगावच्या सरपंच योगिनी खांडगे, लाखणगावच्या सरपंच प्राजक्‍ता रोडे, बाबाजी करंडे, गौतम खरात, गौतम रोकडे, माऊली आस्वारे यांच्यासह ग्रामस्थ, विविध संस्थाचे प्रतिनिधी, मतदार उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, येथील खासदारही विकासकामांच्या बढाया मारण्यात पटाईत झाले आहेत. आश्‍वासने देवून निवडणुका जिंकण्याचा त्यांचा मनसुबा आता धुळीला मिळणार आहे. पुणे-नाशिक हमरस्त्याचे काम का रखडले आहे. याचे उत्तर वेगळेच निघाले आहे. कंत्राटदार पळून का गेला. कारण त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण काहींनी केल्याची चर्चा असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या डॉ. कोल्हेंना निवडून द्या म्हणजे प्रलंबित विकासकामांचा निपटारा होईल, अशी ग्वाहीत्यांनी दिली. सभेला युवक-युवतींसह ग्रामस्थांची मोठी गर्दी होती.

मोदी उद्योगपतींचे बाहुले बनले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास खुंटला आहे. मोदी हे उद्योगपतींचे बाहुले बनले आहेत. गेल्या पाच वर्षांत देशात प्रचंड आर्थिक मंदी आली आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करतो. अनेक शेतकरी कर्जबाजाराच्या विळख्यात सापडले आहेत. मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी शेतकऱ्यांनी चंग बांधला असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)