डुंबरवाडीच्या तरुणांकडून वाहनचालकांना मार्गदर्शन

नगर-कल्याण महामार्गावर अपघात टाळण्यासाठी रात्री ग्रामस्थांचे प्रयत्न

शिवनेरी- नगर-कल्याण महामार्गावर वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथील काही स्थानिक ग्रामस्थ या मार्गावर थांबून बेदरकार वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांना सावध करीत आहेत आणि रस्त्यावर अपघाताच्या ठिकाणी वाहने योग्य नियमाप्रमाणे चालवण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.

डुंबरवाडी (ता. जुन्नर) याठिकाणी रस्त्याला टोल उभारणी करण्यात आली असून, स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे अद्याप हा टोल सुरू झालेला नाही. या ठिकाणी टोल उभारणीमुळे अहमदनगर-कल्याण रस्त्याला येथे दुहेरी वाहतूक मार्ग करण्यात आला आहे. याठिकाणी संबंधित कंपनीकडून मोठमोठे गतिरोधक बसविण्यात आलेले आहेत, येथे ये-जा करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर आहेत. याठिकाणी टोल झाल्यापासून अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत.

नुकताच काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा दुर्घटना वरचेवर होऊ नयेत म्हणून या ठिकाणच्या ग्रामस्थांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्वतः थांबण्याचा निर्णय घेतला व अपघात टाळण्यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना व प्रवाशांना दुचाकीस्वारांना शिस्तबद्ध वाहतूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अपघात रोखण्यासाठी येथील ग्रामस्थ दररोज टोल नाक्‍यावर थांबून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणाऱ्यांना चपराक देणार आहेत. तसेच त्यांच्यावर पोलिसांकडून देखील कारवाई करण्याची मागणी करणार आहेत असे येथे जमलेल्या ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान दोन दिवसांपासून ये जा करणाऱ्या वाहन चालकांनी येथील ग्रामस्थांचा धसका घेतला असून सध्या या बंद असलेल्या टोलवरून ते नियमानुसार वाहने चालवत आहेत. यात गतिरोधक वाचवण्याच्या प्रयत्नात विरुद्ध बाजूने ये-जा करणारे वाहनचालक, दैनंदिन प्रवास करणारे, तसेच एसटी बसचाही समावेश आहे, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

  • दुहेरी रस्ता असला तरी देखील काही वाहने विरुद्ध दिशेने येथून ये-जा करत असतात. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे अपघात होत आहेत. काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशाप्रकारे नियम बाह्य आणि बेशिस्त वाहतूक करणाऱ्या वाहनांना शिस्त लावण्यासाठी गावातील तरुणांना घेऊन सायंकाळी व रात्री टोलवर उभे राहून वाहनचालकांना सूचना देत आहे जेणेकरून विरुद्ध दिशेने वाहने येऊ नये. याकरिता गेल्या दोन दिवसांपासून काम करीत आहोत. या उपायामुळे येथे होणारे अपघात टळू शकतील असा प्रयत्न ग्रामस्थांचा आहे
    – तानाजी डुंबरे, सरपंच, डुंबरेवाडी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.