डी. एस. कुलकर्णी यांच्या मेव्हणीला अटक

पुणे – बांधकाम व्यावसायीक डी. एस. कुलकर्णी यांच्या मेव्हणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे (61, रा. धनकवडी) यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांची मेव्हणी डी. एस. के. कंपनीमध्ये लेखा विभागात कार्यरत होती; तर काही वर्षे तिने लेखा विभागाची उपाध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहीले आहे. याप्रकरणातील ही सातवी अटक आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या समवेत त्या कंपनीत भागीदार असल्याचे तसेच गुंतवणूकदारांच्या फसवणुकीत सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

अनुराधा या हेमंती कुलकर्णी यांच्या भगिनी आहेत. दरम्यान, अनुराधा यांना न्यायालयात हजर केले असता 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अनुराधा या डीएसकेडीएल या पब्लिक लिमीटेड कंपनीत लेखा विभागात 1985-86 पासून कार्यरत आहेत. त्या लेखा विभागाच्या उपाध्यक्षा (व्हाईस प्रेसिडेंट) सुध्दा होत्या. तसेच डी. एस. कुलकर्णी ऍन्ड कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे होते. सॉफ्टवेअरचा पासवर्ड केवळ त्यांच्याकडे असल्याने कंपनीकडे कर्ज स्वरुपात ठेवी होत्या. त्या व्यक्तींची नावे जाणून घेण्यासाठी पासवर्ड प्राप्त करावयाचा आहे. त्यांनी अपहाराच्या पैशातून कोठ कोठे मालमत्ता घेतल्या आहेत, त्याचाही तपास करायचा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फुरसुंगी येथील ड्रीमसीटी प्रकल्पाची जमीन एसबीआयकडे कर्जाच्या बदल्यात गहाण ठेवली असताना, या जमिनीचे प्लॉट देतो असे अनूराधा यांनी ठेवीदारांना सांगितले होते. या प्रकारे 13 गृहप्रकल्पांच्या नावाने कर्ज घेऊन ते दुसरीकडे वळवण्यात आले आहे. तसेच 2010 ते 2017 दरम्यान शिरीष कुलकर्णी यांनी स्विकारलेल्या ठेवीतून 154 कोटी इतरत्र वर्ग करण्यात आले आहेत. याच काळात डीएसके यांच्या खात्यातून 90.94 कोटी वर्ग करण्यात आले; तर सिस्टर कन्सर्न कंपन्यांना सदर कालावधीत 24 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. यासर्वांचा तपास करायचा असल्याने अनुराधा यांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने अनुराधा यांना 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आतापर्यंत सहा जणांना अटक..
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आजवर डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी, पुतणी सई केदार वांजपे, जावई केदार वांजपे, सीईओ धनंजय पाचपोर, वित्त विभागातील अधिकारी विनयकुमार बडगंडी अशा सहा जणांना अटक केली आहे. डी. एस. के. दांम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत तर उर्वरीत चौघे पोलीस कोठडीत आहेत.

चांगल्या परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. के. दांम्पत्याला आर्थिक गुन्हे शाखेने दिल्ली येथून अटक केली होती. त्यांच्यावर 2043.18 कोटी रुपयांची फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात 278 बॅंकखाती गोठवण्यात आली आहेत; तर 16 चारचाकी वाहने, एक दुचाकी, सर्व्हरमधील डेटा, मोबाईल, लॅपटॉप, कागदपत्रे 2,97,67,200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निलेश मोरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)