“डीपी’साठी औरंगाबाद “पॅटर्न’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नवनगर विकास प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रासह संयुक्‍तपणे सुधारीत करण्यात येणार आहे. औरंगाबाद महापालिकेतील नगररचना विभागाचे अधिकारी पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा तयार करत आहेत. याकरिता प्रधिकरणाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीची विकास योजना आणि पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची विकास योजना 1995 मध्ये मंजुर झाली आहे. नगरविकास विभागाच्या अधिसुचनेनुसार, प्राधिकरणाचे नियोजन नियंत्रणाखालील क्षेत्र पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजन नियंत्रणाखाली वर्ग करण्यात आले आहे. महानगरपालिका आणि प्राधिकरणाच्या एकूण 86 चौरस किलोमीटर नियोजन क्षेत्रासाठी विकास योजना तयार करण्यात आली होती.

या विकास योजनेच्या नियोजन क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सुमारे 12.52 चौरस किलोमीटर क्षेत्रही समाविष्ट होते. आता महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीची विकास योजना प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रासह संयुक्‍तपणे सुधारीत केली जाणार आहे. प्राधिकरण आणि महापालिकेचे क्षेत्र संलग्न असल्याने दोन्ही संस्थांनी विकास योजना विषयक प्रस्तावांचे नियोजन एकत्रितपणे केल्यास खर्चाचा भार कमी होईल, असे पत्र तत्कालीन आयुक्तांनी पाठविले होते. त्यानुसार, राज्याच्या नगररचना संचालकांनी महापालिकेकडे अभिप्राय मागविला होता. त्या अनुषंगाने महापालिकेने 21 नोव्हेंबर 2013 रोजीच्या महासभेत ठरावाद्वारे संमती दर्शविली होती.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिका जुन्या हद्दीची विकास योजना सुधारीत करण्याचे काम औरंगाबाद महापालिकेतील नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. त्यासाठी त्यांचे स्थलांतरण पिंपरी – चिंचवड प्राधिकरणाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये केले आहे. त्यांच्यासाठी प्राधिकरणात स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर आता विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिकेतील नगररचना विभागाचे अधिकारी विकास आराखडा बनवित आहेत. प्राधिकरणात त्यांना कार्यालय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिका, एमआयडीसी, महसूल विभागातील अधिका-यांची नुकतीच एक संयुक्‍त बैठक पार पडली आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्‍त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)