‘डीपी’मधील पूल आधी बांधावा

“त्या’ वादग्रस्त पुलाबाबत विरोधकांचा पालिकेत फेरप्रस्ताव

पुणे – बांधकाम व्यावसायिकाने पूल बांधण्याची तयारी दर्शविली असतानाही, खराडी स. नं 16/4 अ मध्ये महापालिकेच्या निधीतून पूल बांधण्यास नोव्हेंबरच्या मुख्यसभेत भाजपने मान्यता दिली. मात्र, या पुलाच्या प्रस्तावाचा फेरविचार करून त्याऐवजी विकास आराखड्यात प्रस्तावित खराडी ते मुंढवा पुलाचे काम आधी करावे, त्यानंतर या पुलाचा विचार केला जावा, असा प्रस्ताव कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून मुख्यसभेत देण्यात आला आहे.

मुंढवा येथे अनेक बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी घेऊन तेथे स्कीम सुरू केल्या. पूर्वी हा भाग महापालिकेत समाविष्ट नव्हता. त्यावेळी या स्कीमपासून खराडीमार्गे शहरात येण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकांनी नदीवरील पुलाचे काम करण्याची तयारी दर्शवली होती.

“पीएमआरडीए’ने तशी परवानगीही दिली होती. केवळ महापालिका हद्दीतील जोड रस्त्यांचे काम करण्यासाठी हा रस्ता आखून मिळावा, यासाठी महापालिकेकडून परवानगी मिळावी, असा अर्ज “पीएमआरडीए’ने महापालिकेकडे केला होता. दरम्यान, मुंढव्याचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी हा रस्ता करण्यास असमर्थता दर्शवली.

मात्र, महापालिका प्रशासनाने स्वत:हून पुढाकार घेत हा रस्ता आखण्याची तयारी दर्शवली. मागील शहर सुधारणा समितीने हा प्रस्ताव नामंजूर करत प्रशासनाकडे परत पाठवला होता. आता प्रशासनाने नवीन शहर सुधारणा समितीपुढे सप्टेंबरमध्ये पुन्हा हा प्रस्ताव ठेवला. या समितीनेही पूर्वीचीच भूमिका कायम ठेवत प्रस्ताव परत पाठवला. त्यास इतर भाजपवगळता सर्व पक्षांनी विरोध केला होता. मात्र, बहुमतच्या जोरावर तो नोव्हेंबरच्या मुख्यसभेत मंजूर करण्यात आला.

फेरविचारासाठी मुद्दे
नवीन रस्त्याची आखणी करून पूल उभारण्याच्या प्रस्तावाचा फेरविचार कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी दिला आहे. त्यात, खराडीमधील प्रस्तावित पुलाऐवजी खराडी येथे डीपीमध्ये मुंढव्याकडे जाणारा पूल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हा पूल 100 फूट रस्त्यास जोडला आहे. तर प्रस्तावित पूल 80 मीटर रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे आधी डीपीतील पूल करावा, त्यासाठी तातडीने निधी द्यावा त्यानंतर प्रस्तावित पूल करावा, तसेच नवीन पूल आधी पीएमआरडीए हद्दीत होता. त्या वेळी विकसकाने तो बांधण्याची तयारी दर्शविली होती. त्या नंतर आता हे गाव महापालिकेत आल्याने “पीएमपीआरडीए’प्रमाणेच महापालिकेलाही हा पूल विकसकाने बांधून द्यावा, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)