डिप्रेशन समजून घेतांना… 

प्राची पाठक

आजकाल सारखा कानावर पडणारा शब्द म्हणजे डिप्रेशन. कोणीही, कुठेही आणि सहजच वापरायचा शब्द झालाय हा. 
शांत का बसलाय? तर म्हणे डिप्रेशन आलंय. 
काम का करत नाही? तर म्हणे डिप्रेस्ड आहे. 
उशीर का झाला? म्हणे डिप्रेस्ड वाटत होते. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कामं टाळायचे, आळसात लोळायचे कारण पाहिजे लोकांना, आलेत मोठे डिप्रेस्ड व्हायला, अशीही अनेकांची धारणा असते. काही लोकांना वाटते, यांना काय धाड भरलीये? सगळी सुखं आहेत. हवं ते मिळायची सोय आहे. काय कमी आहे? सुखं बोचते म्हणतात नं, तेच डिप्रेशन. खात्रीच करून टाकलेली असते त्यांनी. खास करून तरुण मंडळी आळशीपणा करतांना दिसली, उदास दिसली, तर मोठ्यांनी त्यांना ओरडायची सोय देखील ह्या शब्दाने झालेली आहे. व्यायाम नको, खाणे-पिणे धड नाही, सारखं मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसायचं, आयुष्यात कशात लक्ष नाही, काही ध्येय नाही आणि म्हणे डिप्रेस्ड! सकाळी वेळच्यावेळी उठा, रात्री वेळच्यावेळी झोपा, कामं करा, ध्येय ठेवा, नीट घरचे जेवा, मग कशाला येईल डिप्रेशन बिप्रेशन? असेच अनेकांना वाटत असते. इतके सोपे असते का डिप्रेशन? आळस म्हणजे डिप्रेशन का? सकाळी वेळच्या वेळी उठले आणि रात्री वेळच्यावेळी झोपले की डिप्रेशन येतच नाही का? काहीच करावेसे न वाटणे म्हणजे डिप्रेशन का? साधा डास मारायला कोणी तोफांचा भडीमार करणार नाही. तसेच, मनातल्या हर एक लहान मोठ्या, क्षणिक येणाऱ्या, तात्पुरत्या असणाऱ्या भावनांना कोणी तज्ज्ञ डिप्रेशन आलेय, असा शिक्का मारणार नाही.

नेमके काय असते काय हे डिप्रेशन? कोणकोणत्या वेळी आपण डिप्रेशन शब्द सहज वापरून टाकतो, ते आठवू. आपण डिप्रेस्ड आहोत की डाऊन आहोत? कोणी म्हणते मी सॅड आहे. लो फील करतोय. नर्व्हस आहे. कंटाळले आहे. बोअर होतंय. दुःखी वाटतंय. सगळ्यांत सोप्पे, हॅपी नाही, म्हणजे डिप्रेस्ड, असेही अनेक जण म्हणत असतात. कशाला काही अर्थ नाही, असे वाटणे म्हणजे डिप्रेशन का? होपलेस हा एक शब्द शिवीसारखा आपल्या अंगावर आदळतो. आपण होपलेस असणे, हे समोरच्यासाठी डिप्रेशनचे कारण असते. इतके आपण होपलेस असतो! कुणाला एकटं वाटतं आणि तरीही लिव्ह मी अलोन म्हणावसं वाटतं. जरा भीती असते असली, चिंता वाटत असते, ते पण डिप्रेशन असते का? अजून कायकाय शब्द असतात बरं? मूड नाही, ब्लॅंक झालेय, खिन्न आहे, काहीतरी बोचतेय, टेन्शन आलंय, काहीच सुचत नाही, थकलोय आयुष्याला… हे आणि असे सगळे दमले -भागलेले- रडके शब्द डिप्रेशन नामक एकाच पोत्यात आपण भरून टाकत असतो.

ह्या सगळ्या भावना म्हणजे खरेतर डिप्रेशन नसते. नैराश्‍य कशाला म्हणायचे हेच आपले पक्के ठरलेले नसेल, तर प्रत्येक नकारात्मक भावना आपण अशाच कोणत्या रंगात रंगवून टाकणार. तो शब्द उच्चरला की बाकीच्यांनी आपल्याला सहानुभूतीने समजून घ्यावे, असे आपल्याला वाटत राहणार. हे माझ्या मनाचे खेळ नाहीत, माझ्या मनाचा काहीतरी गंभीर लोचा आहे, हे तुम्हांला ओरडून ओरडून सांगावेसे वाटत असते. पण कोणालाच ते समजणार नाही, असेही वाटत असते. डिप्रेशन हा इतका सहजच वापरायचा शब्द नाही. आपल्या नर्व्हस वाटण्याला अनेक शेड्‌स असतात. त्यांचा आपल्याशीच आधी थोडा गृहपाठ करायला हवाय. करून तर बघा!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)