डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या वितरिकेची दुरवस्था

पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त : शेतातील पिके लागली जळू

लाखणगाव – डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेणू सागर) उजव्या कालव्यातील अवसरी खुर्द ते खडकवाडी दरम्यान असलेल्या चाऱ्या आणि पोटचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. शेताला पाणी मिळत नसल्यामुळे पिके जळू लागली आहेत. यामुळे अधिक दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्येत अजून भर पडली आहे. त्यामुळे कालव्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

उजव्या कालव्याचे पाणी शेतापर्यंत नेण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा खर्च केला खरा पण हे पाणी शेतापर्यंत पोहचत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांची याबाबत असलेली भूमिका व जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष यामुळे वितरिकांची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. उजव्या कालव्याचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. परंतु, हे पाणी शेतापर्यंत पोहोचले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पाण्याशिवाय शेती करणे शक्‍य नाही. हे तंत्र जाणून आंबेगाव तालुक्‍यात शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून डिंभे धरणाची उभारणी केली गेली होती. पण अजूनही तालुक्‍यातील सगळ्या शेतकऱ्यांना हे पाणी अपुऱ्या नियोजनामुळे पोहोचत नाही. कालव्याचे पाणी थेट शेतात नेण्यासाठी संबंधित विभागाने वितरिका व उपवितरिकांची योजना आखली. पण ती नाममात्र उरली आहे. या वितरिकांत मोठ-मोठी झाडे उगवली आहेत. झाडे इतकी मोठी आहेत की वितरिका व उपवितरिका शोधाव्या लागतात.

मंचर, अवसरी, मेंगडेवाडीपासून तर थेट कवठे-सविंदणेपर्यत या वितरिका व उपवितरिकांची अशीच अवस्था झाली आहे. उपवितरिकांचे सिमेंट ब्लॉक तर काही शेतकऱ्यांनी चक्‍क जमिनीचे बांध निर्धारित करण्यासाठी वापरले आहेत. काही वितरिका तर जमिनीतच हरवून गेल्या आहेत. या वितरिकांची झालेली गैरसोय दूर झाल्यास शेतकऱ्यांना थेट शेतात पाणी वापरता येणार आहे. याबाबत जलसंपदा विभागाने उजव्या कालव्यातील झाडे-झुडपे काढून वितरिका दुरुस्त केल्यास पाणी वहनक्षमता वाढून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळू शकेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.