डिंभेच्या पाण्यामुळे सविंदणे परिसर सुखावला

परिसरातील पाणीप्रश्‍न काहीअंशी सुटला

सविंदणे- डिंभा धरण आंबेगाव – शिरूर तालुक्‍यासाठी नेहमीच वरदान ठरलेले आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाला नसल्यामुळे दुष्काळसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. डिंभा धरण क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरण 100 टक्‍के भरले होते. त्यामुळे सध्या पिण्याच्या पाण्यासाठी डिंभा उजव्या कालव्याला पाणी सोडलेले आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात सविंदणे, कवठे येमाई, मलठण, सोने सांगवी, निमगाव भोगी, कर्डिलवाडी गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न संपुष्टात आला आहे. तसेच चाऱ्याचा प्रश्‍न बऱ्यापैकी सुटला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने डिंभा धरण हे या भागातील नागरीकांसाठी वरदान ठरलेले आहे. सविंदणे गावाशेजारील मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, मोराची चिंचोली येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरु करण्यात आले आहे. डिंभा उजव्या कालव्याला पोटचारी तयार करून आम्हाला पाणी द्यावे, अशी मागणी मिडगुलवाडी, कान्हूर येथील नागरीकांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे. सध्या धरणामध्ये 13 टक्‍के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडत असून पाणी जपून वापरावे, असे आवाहन शाखा अभियंता विलास बारवकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.