शिरूर तालुक्यात संतापाची लाट : कवठे येमाई परिसरात पाण्यासाठी दाहिदिशा
सविंदणे- डिंभा उजव्या कॅनॉलच्या आवर्तनात शिरूरकरांवर अन्याय होत आहे. सध्या डिंभा उजव्या कॅनॉलला दि.6 मार्चपासून आवर्तन सोडले होते. टेल टू हेड याप्रमाणे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. परंतू आंबेगाव तालुक्यात कॅनॉलच्या चाऱ्या फोडून पाणी वळविण्यात येत आहे. त्यामुळे अद्याप शिरुरकरांना पाणी पोहचले नसल्याने सविंदणे, कवठे येमाई, मलठण, सोने सांगवी, कर्डिलवाडी परिसरात पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. आंबेगाव तालुक्यामध्ये पाटबंधारे विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहे. कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करीत नाही. सध्या लांडेवाडी येथे कॅनॉलला पाणी चोरीसाठी भगदाड पडल्यामुळे दुरुस्तीसाठी दोन दिवस आवर्तन बंद केले. त्यामुळे शिरुरपर्यंत पाणी पोहचण्यास आणखी विलंब होणार आहे. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याने शिरूर परिसरातील नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. कलम 144 त्वरित लागू करुन पोलीस बंदोबस्तात शिरूर तालुक्याला पाणी द्यावे, अशी मागणी शिरूर तालुक्याच्या लाभक्षेत्रातील नागरिकांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे कालवा फोडल्याने डिंभा धरणातून दुरुस्तीसाठी आवर्तन बंद केल्याने शिरूरच्या सविदणे, कवठे येमाई, मलठण, कर्डिलवाडी, सोनेसांगवी या परिसरात दुष्काळाची छाया गडद पसरली आहे. चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तहसीलदार, अधिकारी वर्ग निवडणूक प्रक्रियेत व्यस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. कवठे येमाईजवळच्या माळवदे वस्तीवर पाणीप्रश्न बिकट झाला आहे. कालव्यावर मोटर टाकण्यासाठी दोन दोन हजार रुपये पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतले आहेत. त्याची कुठलीही शासकीय पावती दिली जात नाही, असा आरोप शेतकरी म्हातारबा माळवदे यांनी केला आहे. मिडगुलवाडी येथे टॅंकर चालू आहेत. तसेच मलठणच्या लाखेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने एक टॅंकर दिला असून तो अपुरा पडत आहे. शासनस्तरावरुन याठिकाणी वाडी वस्तीवर भेट देवून आणखी टॅंकर देण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या राणी मुकुंद नरवडे यांनी केली आहे. एकूण या सर्व गावांतील नागरिकांनी टॅंकरची मागणी केली असून आवर्तन व्यवस्थित न सोडल्यास मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा संतप्त महिला आणि नागरिकांनी दिला आहे.
- पाणी वाटपामध्ये समन्वयाचा अभाव व नियोजन पाटबंधारे विभागाने केले नाही. अधिकारी तोंड बघून पाणी देतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात चारा टंचाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठया प्रमाणात निर्माण होणार आहे. यास सर्वस्वी शासन जबाबदार आहे. वरिष्ठ आधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नियोजन करावे.
– डॉ. सुभाष पोकळे, पंचायत समिती सदस्य, शिरूर. - पाणीपुरवठा योजनेपर्यंत पाणी न पोहचल्यामुळे पाणीपुरवठा योजना पाणी नसल्यामुळे बंद पडली आहे. नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पत्र देवूनही अद्याप पाणी मिळाले नाही.
– वसंत पडवळ, सरपंच सविंदणे.