डाऊला हद्दपार करणारे शिंदेगाव एमआयडीसीसमोर हतबल!

– दत्तात्रय घुले

शिंदे वासुली – डाऊ केमीकल कंपनीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत गावातून हद्दपार करणारे शिंदे (ता. खेड) येथील लढवय्ये ग्रामस्थ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळापुढे मात्र पुरते हतबल झालेले आहेत.

याचं कारण असं की, शिंदे ग्रामपंचायत हद्दीत गट नंबर 250 (एकूण क्षेत्र 62 हे. 74 आर) सरकारी गायरान एमआयडीसीने संपादन केले. शिंदे ग्रामस्थांनी 2008पासून गावच्या विकासासाठी 25 एकर व आदिवासी ठाकर समाजातील बेघर कुटुंबांसाठी 8 एकर 28 गुंठे असे एकूण 33 एकर 28 गुंठे जमीनीची मागणी केली होती. त्यावेळी एमआयडीसी कडून या जमिनीचा रितसर नकाशा तयार करून मागणी केलेली जमीन ग्रामपंचायतीचे ताब्यात देण्यात आली. काही दिवसांत ही जमीन ग्रामपंचायतीचे नावे करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे एमआयडीसीकडून अधिकृतपणे सांगण्यात आले होते. शिंदे गावचे ग्रामस्थ 10 वर्षे सतत पाठपुरावा करुनही मागणी केलेली जमीनीची प्रक्रिया लालफितीत अडकल्याने शिंदे ग्रामस्थ औद्योगिक प्रशासनाच्या उदासीन कारभारावर नाराज व संतप्त आहेत.

दरम्यान औद्योगिक विभागाने शिंदे ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन गट नंबर 250 मध्ये (गायरान) न्यू हॉलंड पॉराईट कंपनीला जागा दिली. त्यावेळी शिंदे ग्रामस्थांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन कंपनीला विरोध करु नका, असे सांगत शिंदे ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी व आदिवासी ठाकर समाजाला राहण्यासाठी मागणी केलेल्या जमीनीचा नकाशा तयार करून जागेचा प्रत्यक्ष ताबा दिला होता. काही दिवसांत या जमिनीचा 7/12 ग्रामपंचायतीचे नावावर करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते; परंतु एमआयडीसी प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेता एमआयडीसीने न्यू हॉलंड पॉराईट कंपनीसाठी ग्रामस्थांच्या हातात “गाजर’ दिल्याचा आरोप शिंदेकरांनी केला आहे. शिंदे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे वतीने जमिनीच्या मागणी 7/12 उतारा ग्रामपंचायतीचे नावावर करण्यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन दिले. भेटीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन उद्योगमंत्र्यांनी लवकरच या जमीनीचा 7/12 उतारा ग्रामपंचायतीचे नावे करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे भाजपा उपाध्यक्ष सुनील देवकर, मेजर दत्तात्रय टेमगीरे आणि अमोल झिंजुरके यांनी सांगितले.

एमआयडीसीच्या चुकीच्या पद्धतीमुळे गावावर अन्याय होत असल्याचे ग्रामस्थांनी खेद व्यक्त केला. सतत पाठपुरावा करुनही एमआयडीसी प्रशासन दखल घेत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. वेळीच योग्य निर्णय घेऊन मागणी केलेल्या एकूण 13 हेक्‍टर 48 आर जमिनीचा 7/12 उतारा शिंदे ग्रामपंचायतीचे नावावर करण्याची कार्यवाही पूर्ण करावी अशी विनंती केली आहे. तसेच प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास शिंदे गावातील एमआयडीसी परिसरात वाहतूक व वाहने बंद करुन न्यू हॉलंड कंपनीचे कारभारास अडथळा निर्माण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ताटात आहे, पण खाता येईना
चाकण एमआयडीसी टप्पा क्र. दोनमधील गावांमध्ये अनेक लहान मोठ्या कंपन्या आल्याने कंपनीच्या सीएसआर फंडातून विविध विकासकामे झाली आहेत. अनेक गावांचा कायापालट झाल्याचे दिसून येते; परंतु शिंदे ग्रामपंचायतीकडे मुबलक जागा, जमीन उपलब्ध नसल्याने व एमआयडीसीने ताबा दिलेल्या जमिनीचा 7/12 ग्रामपंचायतीचे नावावर न केल्याने न्यू हॉलंड पॉराईट कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा सीएसआर फंडाचा पैसा गावाच्या विकास कामांसाठी न मिळता इतरत्र दिला जातो. त्यामुळे शिंदे गाव विकास प्रक्रियेत पिछाडीवर आहे.

गावाच्या प्रगतीचा मानस
शिंदे ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे गावामध्ये शाळा वर्गखोल्या, क्रीडांगण, मंगल कार्यालय, व्यापारी गाळे आदि विकासकामे करण्यासाठी 10 हेक्‍टर जमीन, येथील आदिवासी ठाकर समाजातील बेघर कुटुंबासाठी व या समाजाच्या विविध विकासकामांसाठी 3 हेक्‍टर 48 आर जमीनीची मागणी केली आहे. या जमिनीचा नकाशा तयार करून ताबा ग्रामपंचायतीला दिला असून, 7/12 उतारा नावावर केल्यास कंपनीच्या सीएसआर फंडातून गाव विकासाच्या योजना राबवून गावाला विकास प्रक्रियेत प्रगती करण्याचा मानस शिंदे ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.