डरकाळी काही फुटलीच नाही…

पुणे – कोथरूड येथील अग्निशमन केंद्राचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते भूमिपूजन. ऊन्हामुळे अंगाची काहिली झाली. मात्र पालकमंत्र्यांनी “वेडे’पणावर टाकलेला “गुगली’, वाघाची डरकाळी आणि सूत्रसंचालकाने पाहुण्यांना दिलेली विशेषणे यामुळे कार्यक्रमात हास्याचा गारवा पसरला. “मी नेहमी विचार करतो, यांचे आडनाव “वेडे’ कशावरून पडले.’ “हे “वेडे’ आहेत म्हणून का? असे पालकमंत्री म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावेळी “हे कामाचे वेडे आहेत’ असे म्हणून त्यांनी बाजू सावरून घेतली. मात्र, अनेकांनी डोकी खाजवत पालकमंत्री असे का बोलले यावर उलट-सुलट चर्चा सुरू केली.

कार्यक्रम तोच, स्थळही तेच प्रमुख पाहुणेही तेच, तेच सूत्रसंचालक दिलखुलास पाहुण्यांचे स्वागत करत होता. त्यामध्ये विद्यमान आमदारांना मनोगत व्यक्त करण्यासाठी सूत्रसंचालकाने त्याच्या नेहमीच्या पोतडीतील विशेषणे बाहेर काढली, खडकवासल्याचा बुलंद आवाज, सिंहगडाचा वाघ….. असे म्हणताच सगळ्यांच्या नजरा स्थानिक नव्हे तर शेजारच्या मतदारसंघातील आमदारांकडे वळल्या. आमदार बोलायला लागले. मात्र, आवाज बारीक येत असल्यामुळे पालकमंत्र्यांनी बारीक चिमटा घेत “जरा मोठ्याने बोला’ असा आवाज टाकला. मोठ्याने म्हणजे वाघासारखी डरकाळी टाकून असे पालकमंत्र्यांना म्हणायचे होते. मात्र डरकाळी काही फुटली नाही. दरम्यान, आयोजकाकडून अग्निशामक केंद्राच्या भूमिपूजनासाठी “मी’ आणि चुकून कधी तरी “आम्ही’ हा शब्दप्रयोग करून काय काय केले याचा लेखा-जोखा वाचून दाखविला. हा कार्यक्रम सुरू असतानाच ज्यांनी या कामासाठी निधी मंजूर केला, त्या माननीयांचे आगमन झाले. त्यांना पाहून आयोजकांनी “देखल्या देवाला दंडवत करत’ त्यांचा नामोल्लेख केला. यावेळीही सूत्रसंचालकाने आपल्या पोतडीतील विशेषणे काढताच त्याला गप्प केले.

Leave A Reply

Your email address will not be published.