भिवंडी – ठाण्यातील भिवंडी भागात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या परिसरातील चार जणांनी अल्पवयीन मुलीवर अपहरण व बलात्कार केला होता. याशिवाय कुटुंबीयांना मारहाणही केली गेली. रविवारी पीडितेच्या कुटूंबाने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपीने सातवीत शिकणाऱ्या मुलीला भिवंडीतील रिकाम्या इमारतीत नेले होते. येथे चार आरोपींनी मुलीवर बलात्कार केला. याशिवाय कुणाला हे सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली.
काही दिवसांपूर्वी आरोपींनी पीडित मुलीला आणि तिच्या कुटूंबाला मारहाण केली. यानंतर पीडित कुटुंबाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने गणेशपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आज 14 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी बलात्कारासह इतर कलमांमध्ये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत.