ठरलं… पुढील आठवडयात भाजप इच्छूकांच्या मुलाखती

नेमके इच्छूक समोर येणार

पुणे :  विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील इच्छूकांच्या मुलाखतींना अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुढील आठवडयात 29 ऑगस्ट ( गुरूवारी ) या मुलाखती होणार असून शालेय शिक्षण मंत्री आणि पुण्याचे प्रभारी आशिष शेलार हे इच्छुकांच्या मुलाखती आपटे रस्त्यावरील एका खासगी हॉटेल मध्ये घेणार आहेत. त्यामुळे सर्वच इच्छूक तयारीला लागले आहेत.
भाजपने 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत शहरातील आठही जागा काबीज केल्या होत्या. तर त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीतही भाजपने शहरात विक्रमी मतांनी बाजी मारली आहे. त्यानंतर आता पुन्हा पक्षाकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. या आठही विधानसभा मतदारसंघातून आता भाजपकडील इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली असून इच्छूकांकडून कार्यक्रम, नेत्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासह शहरात मोठया प्रमाणात बॅनरबाजी केली जात आहेत. मात्र,त्याच वेळी पक्षाकडून जिथे भाजपचे आमदार असतील त्या जागा सोडणार नसल्याचे सांगताना, शिवसेने सोबत काही जागांची बदली करण्याचे संकेतही दिले जात आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांचा तसेच काही विद्यमान आमदारांचा जीव टांगणीला लागला आहे. तर या पक्षाकडून विधानसभेची तयारी झालेली असली तरी अद्याप मुलाखती झालेल्या नसल्याने अनेकांची धाकधूकही वाढली आहे. मात्र, आता मुलाखतीचा दिवस निश्‍चित झाल्याने अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

शक्ती प्रदर्शनाला बंदी
भाजपकडून या मुलाखती पक्ष कार्यालयात न घेता, आपटे रस्त्यावरील एका खासगी हॉटेलात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या मुलाखतीसाठी इच्छुकांना कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन करता येणार नाही असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे शक्तीप्रदर्शनासाठी तयार असलेल्या इच्छूकांची चांगलीच तारांबळ झाली आहे. तसेच आठ विधानसभा मतदारसंघ असले तरी, एकाच वेळी सर्वच इच्छूकांची मुलाखत घेतली जाणार असून प्रत्येक इच्छूकासाठी अर्ध्या तासाचा वेळ निश्‍चित करण्यात आला आहे. तर शिवसेनेला अद्याप पुण्यात विधानसभेचा वाटा मिळणार की नाही हे अद्याप युती मध्ये निश्‍चित झालेले नाही. तर भाजपनेही आठही मतदारसंघासाठी तयारी केली आहे. तर शिवसेनेकडून पुण्यात हडपसर आणि शिवाजीनगरच्या जागेची मागणी आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेला काय मिळणार याचीही उत्सूकता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×