टेम्पोच्या धडकेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू

टेम्पोच्या धडकेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू
पुणे,दि.25 – भरधाव टेम्पोच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजता भारती विद्यापीठ येथे घडली . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पो व अपघातात ग्रस्त दुचाकी बाजूला काढली. जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषीत करण्यात आले. विशेष म्हणजे तीने डोक्‍यात हेल्मेट घातले होते. मात्र धडक बसताच हेल्मेट डोक्‍यावरुन खाली पडून ती जखमी झाली. रहदारी वेळीच अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.दरम्यान टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एकता प्रभाकर कोठावदे (वय 29) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकता शनिवारवाडा परिसरात राहते. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण (एमडी) घेते. दुपारी ती कात्रजकडून स्वारगेटकडे येत होती. त्यावेळी राजीव गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासमोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या मालवाहतूक टेम्पोने जोरात धडक दिली. यात खाली कोसळून गंभीर जखमी झाली. नागरिकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु तिचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. माहिती मिळताच भारती विद्यपीठ पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक वैशाली भोसले आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रहदारीवेळी अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास भारती विद्यपीठ पोलीस करत आहेत.
          रस्ता धोकदायक ; उतार जीवघेणा
सातारा रस्त्यावर बीआरीटीचा बट्टाबोळ झाला आहे. यामुळे वाहने कशीही कोठूनही जातात. यातच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अपघात घडला त्या ठिकाणी सर्पोद्यान तसेच कात्रज दुध डेअरी आहे. तसेच मुंबई आणी बेंगलोर हायवेला हा रस्ता पुढील चौकात मिळतो. यामुळे दिवस रात्र येथे अवजड वाहनांची व इतर छोट्या मोठ्या वाहनांची वाहतूक असते. सर्पोद्यानसमोरील सिग्नलला भारती विद्यापीठच्या मागच्या बाजूने येणारा रस्ता मिळतो. हा रस्त प्रचंड उताराचा आहे, अशातच तेथेच खेटून कचरा डोपो आहे. या कचरा डेपोतील जड वाहने व टॅक्‍टरही येथूनच वाहतूक करतात. यामुळे उतार धोकादायक आहे. यातच जोडून सर्व्हिस रस्ता आहे. यामुळे सिग्नल लागल्यावर आणी सुटल्यावर वाहने कशीही आणी कोठेही जातात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागले. शेजारीच वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. मात्र वाहतूक पोलिस एखाद्या दुसऱ्या वेळेत येथे वाहतूक नियंत्रण करताना दिसतात.

Leave A Reply

Your email address will not be published.