टेबल टेनिस स्पर्धा: प्रकाश केळकर व सुहासिनी बाकरे यांना विजेतेपद 

डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक प्रौढ राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धा 
पुणे: प्रकाश केळकर, सुहासिनी बाकरे, सतीश कुलकर्णी, पिनाकिन संपत व सुबोध देशपांडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक महाराष्ट्र प्रौढ राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेतील विविध गटांत विजेतेपद संपादन केले. पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब यांनी पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
पीवायसी क्‍लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेतील 60 वर्षांवरील पुरुषांच्या गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकित प्रकाश केळकरने पुण्याच्या तिसऱ्या मानांकित अविनाश जोशी यांचा 11/5,11/9,11/7 असा पराभव करीत विजेतेपदाची निश्‍चिती केली. तर 60 वर्षांवरील महिलांच्या गटात पुण्याच्या सुहासिनी बाकरेने मुंबई शहरच्या मंगला सराफचा 11/4,3/11, 11/6,11/7 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
याशिवाय 65 वर्षांवरील पुरुषांच्या गटात मुंबई शहरच्या सतीश कुलकर्णीने आपला शहर सहकारी योगेश देसाईचा 13/11,5/11, 11/4,6/11,11/6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत मुंबई शहरच्या पिनाकिन संपतने पुण्याच्या विकास सातारकरवर 11/8,12/14, 11/3,11/9 अशी मात करीत 70 वर्षांवरील पुरुषांच्या गटात अजिंक्‍यपदावर शिक्‍कामोर्तब केले. तर 75 वर्षांवरील पुरुषांच्या गटात पुण्याच्या अव्वल मानांकित सुबोध देशपांडे यांनी मुंबई उपनगरच्या आर राव यांचा 11/6,11/6,11/6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्या मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी क्‍लबच्या टेबल टेनिस विभागाचे सचिव गिरीश करंबेळकर, पीवायसी क्‍लबचे वसंत चिंचाळकर, महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्ष स्मिता बोडस, संयोजन सचिव अविनाश जोशी, दीपक हळदणकर, मधुकर लोणारे, उपेंद्र मुळ्ये, कपिल खरे, राहुल पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)