टीटीव्ही दिनकरन यांच्या कारवर पेट्रोल बॉम्बने हल्ला दोन जण जखमी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत रविवारी अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) या पक्षाचे प्रमुख टीटीवी दिनकरन यांच्या कारवर रविवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. या हल्लेखोरांनी देशी पेट्रोल बॉम्बचा वापर करत दिनकरन यांच्या वाहनावर निशाणा साधला. मात्र, दिनकरन कारमध्ये नसल्याने या जीवघेण्या हल्ल्यातून ते बचावले आहेत. मात्र त्यांचा चालक आणि एक छायाचित्रकार यात गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला कोणी आणि कोणत्या उद्‌देशाने केला हे अद्याप कळू शकलेले नाही. कदाचित या हल्ल्याद्वारे कट रचणाऱ्यांना काहीतरी संदेश द्यायचा असेल. दरम्यान, यासंदर्भात स्वतः दिनकरन यांनीही अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तातडीने विशेष पथकांची नेमणूक करत हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
काही महिन्यांपूर्वीच दिनकरन यांनी अण्णा द्रमुक पक्षाशी फारकत घेत आपला अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) हा नवीन पक्ष स्थापन केला होता. पक्ष स्थापनेदिवशी दिनकरन यांनी अण्णा द्रमुकच्या प्रमुख दिवंगत जयललीता यांची आठवण काढली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या झेंड्यावरही जयललीता यांची प्रतिमा लावली होती. अण्णा द्रमुक पक्षाला काही लोकांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पक्षाला त्यांच्यापासून सोडवण्यासाठी आपण नवा पक्ष स्थापन केल्याचे त्यांनी म्हटले होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)