#टिपण: पुण्याच्या रणांगणात “तिसरी शक्‍ती’ शून्यवतच! 

शेखर कानेटकर 
एक काळ असा होता की पुणे शहरामध्ये समाजवादी व डाव्या विचारांच्या पक्षांचे बऱ्यापैकी स्थान होते, या विचारांवर ठाम असलेले नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा प्रभाव व अस्तित्व होते. त्यांच्या चळवळी, आंदोलने, लढे, वैचारिक मंथन वगैरे होताना दिसत असे. ज्याला पुढे “तिसरी शक्‍ती’ संबोधले जाऊ लागले. तिचे अस्तित्व पुण्यात जाणवत असे; परंतु पुढे काळाच्या ओघात पुण्यातून ही “तिसरी शक्‍ती’ आपले अस्तित्व, प्रभाव गमावून बसलेली दिसते. निवडणुकीच्या राजकारणात तर ती जवळपास शून्य झालेली आहे. 
आगामी 2019 च्या सार्वत्रिक अर्थात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक पातळीवर उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली आहे. सध्या पुण्याचे खासदार भाजपाचे असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्त्व आमदारकी, महापालिकांपुरतेही जवळपास उरलेले नाही.
गैरकॉंग्रेस व गैरभाजप शक्‍ती म्हणजे ही तिसरी शक्ती पूर्वी कॉंग्रेसला विरोध करण्यात ही “तिसरी शक्‍ती’ आघाडीवर होती. आता त्यांची जागा भाजपने घेतली आहे. नुसती जागाच घेतली आहे, असे नव्हे भाजपने कॉंग्रेसलाच नामोहरम केले आहे.
पुण्यात पूर्वी एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मोहन धारिया ही भारतीय पातळीवर चमकणारी मंडळी होतीच; परंतु वसंतराव तुळपुळे, मालिनीबाई तुळपुळे, रमेश अर्थात भाई टिळेकर, वसंतराव भागवत, कमलाबाई भागवत, भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, ग. प्र. प्रधान, डॉ. कुमार सप्तर्षी यासारखे समाजवादी, डाव्या विचारांचे ज्येष्ठ पुरस्कर्तेही चमकत होते, सक्रिय होते. त्यातील बरेचसे काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या पाठोपाठ या विचारांची ताकदही कमी होत गेली. डॉ. बाबा आढाव, डॉ. सप्तर्षी आता सक्रिय राजकारणापासून दूरच आहेत.
भारतात लोकसभेच्या आतापर्यंत 16 निवडणुका झाल्या. त्यातील तीन निवडणुकात पुणेकरांनी समाजवादी विचारांच्या नेत्यांना लोकसभेत निवडूनही पाठविले. परंतु, 1977 नंतर या “तिसऱ्या शक्‍ती’चा एकही नेता लोकसभेवर पुण्यातून निवडून जाऊ शकलेला नाही. विधानसभेची परिस्थितीही फारशी वेगळी नाही.
गेल्या 41 वर्षांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणेकरांनी कॉंग्रेस व भाजप या दोन पक्षांच्या पारड्यातच विजयाचे माप टाकलेले दिसून येते. एवढेच काय “तिसऱ्या शक्‍ती’ला पुण्यातून विजय मिळवून देऊ शकेल, असा निदान तगडा उमेदवारही पुण्यातून उभा करता येऊ शकलेला नाही, हे वास्तव आहे.
संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात सन 1957 मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत नानासाहेब गोरे यांना पुणेकरांनी आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत निवडून पाठविले होते. त्यांनी काकासाहेब गाडगीळांसारख्या मातब्बर नेत्याचा तेव्हा पराभव केला होता. पण सन 1962 च्या पुढच्या निवडणुकीत त्यांना पुण्याची जागा राखता आली नाही. सन 1980 मध्ये पुन्हा जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी पुणेकरांना कौल लावला होता. पण पुणेकरांनी तेव्हाही त्यांच्या पारड्यात पुन्हा यश टाकले नाही.
सन 1957 नंतर दहा वर्षांनी पुण्यातून ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी हे लोकसभेवर निवडून गेले होते. सन 1977 मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षातर्फे लोकसभेत मोहन धारिया विजयी झाले होते. विशेष म्हणजे आदल्या निवडणुकीत 1971 मध्ये ते कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. धारिया पक्षांतर करून 1977 मध्ये उभे राहिले; पण त्यांनी आणीबाणीविरोधात दिलेल्या लढ्याची पावती म्हणूनच त्यांना पुणेकरांनी पुन्हा विजयी केले. कथित “तिसऱ्या शक्‍ती’चा हा 1977 मधील पुण्यातील शेवटचा विजय. त्यानंतर गेल्या 41 वर्षात या शक्‍तीला पुण्यातून विजय मिळविता आलेला नाही.
पुण्यातून दोनदा (1971-1977) विजय मिळविलेल्या मोहन धारिया यांना 1984 च्या विठ्ठलराव गाडगीळ व जगन्नाथराव जोशी यांच्या लढतीत तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले. जनता दलाचे उमेदवार म्हणून त्यांना जेमतेम 53 हजारांचा टप्पा गाठता आला होता. सन 1991 मध्ये अतुर संगतानी, सन 1991 मध्ये संभाजीराव काकडे जनता दलाचे उमेदवार होते. पण त्यांना जेमतेम एक लाख मतांपर्यंत मजल गाठता आली. सन 1996 मध्ये दलित नेते, कवी नामदेव ढसाळ तिसऱ्या शक्‍तीचे उमेदवार होते; पण त्यांनाही 56 हजार मतेच मिळू शकली. सन 2004, 2009 व 2014 च्या निवडणुकीत पुणे शहर मतदारसंघात तिसरी शक्‍ती जाणवलीही नाही. गेल्या चार दशकात निवडणुकीच्या राजकारणात तिसरी शक्‍ती प्रभावहीन, निष्प्रभ ठरत चालली आहे, हे या संदर्भांवरून स्पष्ट होते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही फार वेगळी स्थिती नाही.
पुणेकर मतदारांनी निवडणुकीच्या राजकारणात तिसऱ्या शक्‍तीप्रमाणेच निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची डाळही शिजू दिलेली नाही. सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, अरुण भाटिया, वरिष्ठ पोलीस अधिकारी विक्रम बोके यांनी अलीकडील काळात पुणेकरांना कौल लावला. पण त्यांना अत्यल्प प्रतिसादच मिळालेला दिसतो.
सन 1998 मध्ये शासकीय सेवेतून निवृत्ती स्वीकारत अविनाश धर्माधिकारी निवडणूक रिंगणात उतरले. ते खरे तर संघ-भाजप परिवाराला जवळचे. या निवडणुकीत भाजपने कॉंग्रेसला त्यावेळी सोडचिठ्ठी दिलेल्या सुरेश कलमाडींना पाठिंबा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर, धर्माधिकारींना भरघोस मतदान होईल, असे वाटले होते. पण त्यांची मजल 34 हजार मतांपर्यंतच जाऊ शकली.
अनधिकृत बांधकामाविरोधात जोरदार मोहीम उघडलेले तत्कालीन महापालिका आयुक्‍त अरुण भाटिया यांनी सन 2004 व 2009 या लागोपाठच्या निवडणुकीत पुणे मतदारसंघातून अपक्ष म्हणून उडी घेतली होती. सन 2004 मध्ये त्यांना अवघी 60 हजार मतेच पडली. तर सन 2009 च्या निवडणुकीत तर ती 30 हजारांवर घसरली होती. ज्येष्ठ पोलीस अधिकारी विक्रम बोके निवृत्तीनंतर काही काळ मनसेत दाखल झाले. 2009 च्या निवडणुकीत पुणेकरांनी त्यांची अवघ्या 2 हजार 172 मतांवर बोळवण केली होती.
अधिकारी पदावर असताना केलेल्या कामाचे पुणेकर जरूर कौतुक करतात पण निवडणूक राजकारणात मात्र साथ देत नाहीत. हे यातून स्पष्ट होते. सन 2014 च्या निवडणुकीत निवृत्त लष्करप्रमुख व्ही. के. सिंग, माजी पोलीस आयुक्‍त सत्यपालसिंह देशातील इतर मतदारसंघातून विजयी झाले होते. पुणेकर तिसरी शक्ती व सनदी अधिकाऱ्यांना खासदार म्हणून संधी देण्याच्या बाबतीत उदासीन राहिलेले दिसतात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)