टिपण: तिसरे विक्रमी मुख्यमंत्री फडणवीस! 

शेखर कानेटकर 
महाराष्ट्राचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्‍टोबर 2014 रोजी पदभार स्वीकारला. त्याला पुढील महिन्यात 4 वर्षे पूर्ण होतील. सलग चार वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर राहणारे आतापर्यंतचे ते 17 पैकी केवळ तिसरे मुख्यमंत्री ठरतील, हे विशेष. 
राज्याच्या स्थापनेनंतरचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सलग 11 वर्षे 2 महिने 15 दिवस पदावर राहिले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षाचा कार्यकाल दोनदा पूर्ण केला. पण त्यानंतर एकाही मुख्यमंत्र्याला पाच वर्षांचा सलग कालावधी पूर्ण करता आलेला नाही. नाईक यांच्यानंतर विलासराव देशमुख यांना सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्रिपदावर राहता आले. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर चार वर्षे एक महिना तीन दिवस ते या पदावर होते. (1-11-2004 ते 4-12-2008)
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका वेळेवर वा मुदतपूर्व होवोत, त्याआधी फडणवीस यांना हात लावला जाण्याची शक्‍यता कमीच आहे; अपवाद फक्त चमत्काराचा! त्यामुळे फडणवीस हे नाईकांनंतर मुख्यमंत्रिपदावर सर्वात जास्त काळ राहणारे आणि पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाल सांभाळणारे नेते म्हणून मान मिळविण्याची दाट शक्‍यता आहे.
स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा लौकिक कायम आहे. त्यांच्यावर गंभीर असा आरोपही झालेला नाही. मुख्य म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत निवडणुकांत भरघोस यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांची ही बाजूही भक्‍कम आहे. मोदी-शहा यांचा त्यांच्यावर भरपूर विश्‍वासही आहे. (भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे “नाम के वास्ते’च वाटतात.) प्रदेश भाजपचा चेहरा व भिस्त म्हणजे फडणवीस हेच आहेत.
मध्यंतरी मराठा आरक्षण आंदोलन भडकले, तेव्हा फडणवीस यांचे नेतृत्व बदलणार अशा वावड्या उठल्या होत्या किंवा उठविल्या गेल्या होत्या. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी तसे काही होण्याची शक्‍यता अगदीच कमी वाटते.
वसंतराव नाईक 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 असे सलग 11 वर्षे दोन महिने 15 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. नंतर शरद पवार तीनदा, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख यांना दोनदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली; पण पाच वर्षाचा कार्यकाल यापैकी कोणालाही पूर्ण करता आला नाही. नारायण राणे यांना तर जेमतेम आठ महिने 16 दिवस मुख्यमंत्रिपद वाट्याला आले होते.
महाराष्ट्रात यापूर्वी बरेचदा पत्ते पिसल्याप्रमाणे, निव्वळ राजकीय सोयीसाठी राज्याचे प्रमुख बदललेले पाहावयास मिळते. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, शंकरराव चव्हाण, ए. आर. अंतुले, मनोहर जोशी, विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदावरून केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आले तर पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिपदावरून मुख्यमंत्री म्हणून पाठविले गेले होते. तसेच शंकरराव चव्हाण, शरद पवार यांना मुख्यमंत्री असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले गेले आणि नंतर त्यांना परत राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठविण्यात आले. सुशीलकुमार शिंदे यांनी सन 2004 मध्ये निवडणुकीत यश मिळवून देऊनही त्यांना थेट राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशात पाठविले गेले नि पुन्हा केंद्रात बोलावून त्यांना आधी ऊर्जा व नंतर गृहमंत्री केले गेले.
मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यावर शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील-निलंगेकर आणि नारायण राणे या तिघांनी नंतर अन्य मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून कामही केले आहे. वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक आणि सुशीलकुमार शिंदे यांची मुख्यमंत्रिपद गमवावे लागल्यावर त्यांची काहीकाळ राज्यपाल म्हणून राजभवनात पाठवणी केली गेली होती. शंकरराव-अशोक चव्हाण हे पिता-पुत्र मुख्यमंत्रिपदाचे मानकरी ठरले तर बॅ. ए. आर. अंतुले, शिवाजीराव पाटील-निलंगेकर व अशोक चव्हाण यांना त्यांच्यावरील गंभीर आरोपामुळे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमवावी लागली होती.
या पार्श्‍वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ प्रतिमा व पक्षश्रेष्ठींचा भक्‍कम विश्‍वास ठेवत पक्षाला सतत यश दिल्यामुळे त्यांच्यावर टांगत्या तलवारीची वेळ आलेली नाही. त्यामुळे 5 वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद व्हायला हरकत नसावी.
भाजप-शिवसेना युतीच्या राज्यातील पहिल्या सरकारमध्ये (1995-99) शिवसेना मोठा भाऊ असल्याने मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे होते. या काळात शिवसेनेनेही मनोहर जोशी, नारायण राणे असे दोन मुख्यमंत्री केले होते. मोदी-शहा यांनी फडणवीसांवर मात्र पूर्ण विश्‍वास टाकलेला दिसतो.
भाजप-सेना युतीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. त्यांना हे पद तीन वर्षे 10 महिने लाभले. ही मुदत फडणवीस यांनी आता ओलांडली आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहणारे युतीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची इतिहासात नोंद झालीच आहे. विधानसभा निवडणुकीनंतरचा पुढील पाच वर्षांचा मुख्यमंत्री मीच असणार, हेही फडणवीस यांनी नुकतेच जाहीरही केले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)