#टिपण: अशी होत गेली कॉंग्रेसची घसरण! 

शेखर कानेटकर 
एकेकाळी लोकसभेच्या विक्रमी 415 जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे लोकसभेतील संख्याबळ आता नीचांकी 44 या दोन आकड्यांवर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे एकेकाळच्या या राष्ट्रव्यापी प्रबळ पक्षाला लोकसभेत विरोधी पक्षाचा अधिकृत दर्जाही मिळू शकलेला नाही. 
स्वातंत्र्योत्तर काळातील लोकसभेच्या 16 निवडणुकांमध्ये तब्बल सातवेळा स्वबळावर पूर्ण बहुमत मिळविलेल्या, सहा वेळा 300 पेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या व सहा पंतप्रधान देणाऱ्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाची, कॉंग्रेसची दिवसेंदिवस होत गेलेली घसरण ही लोकशाहीच्या दृष्टीने फारशी समाधान देणारी गोष्ट नाही. समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी आणि आता कॉंग्रेस उतरणीला लागल्याने भाजपला मोकळे मैदानच मिळाले आहे.
सन 1952 ते सन 1971 या 19 वर्षांत झालेल्या पाच लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले होते. त्यावेळी अनुक्रमे 364, 371, 361, 283 व 362 अशी त्रिशतकी मजल कॉंग्रेसने मारली होती. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव होऊनही पक्षाचे 154 खासदार निवडून आले होते. सन 1980 मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी पक्षाच्या 353 जागा निवडून आणून आधीच्या पराभवाचे उट्टे काढले. इंदिराजींच्या हत्येनंतर 1984 मध्ये झालेल्या निवडणुकीत राजीव गांधी यांनी विक्रमी 415 जागा निवडून आणल्या होत्या.
नंतर बोफोर्स तोफांच्या व्यवहारातील दलालीचे प्रकरण गाजल्याने सन 1989 मध्ये कॉंग्रेसच्या जागा निम्म्याने कमी होऊन त्या 167 वर आल्या. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सन 1991 च्या निवडणुकीत कॉंग्रेस खासदारांची संख्या 244 पर्यंतच पोहोचली. नंतरच्या तीन निवडणुकीत पक्ष 140 (1996), 141 (1998) व 114 (1999) असा घसरत गेला. सन 1999 मध्ये भाजपपेक्षा 5 टक्के मते जास्त पडूनही कॉंग्रेसला जागा कमीच मिळाल्या.सन 2004 मध्ये मात्र, कॉंग्रेसला थोडी उभारी मिळून पक्षाच्या जागा 145 पर्यंत तर 2009 मध्ये 206 पर्यंत वाढल्या आणि सन 2014 मध्ये पक्षाने 44 जागांची सर्वात नीचांकी पातळी गाठली.
सन 1989 नंतर पक्षाची जी घसरण सुरू झाली, ती अजूनपर्यंत थांबलेली नाही. सन 2014 च्या निवडणुकीत तर कॉंग्रेसला 11 राज्यात एकही जागा जिंकता आली नाही. ज्या राज्यात थोड्याफार जागा मिळाल्या तेथे एकाही राज्यात दोन अंकी संख्या गाठता आली नाही. सध्या कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर आघाडी, पंजाब व पॉंडेचरी या राज्यातच फक्त कॉंग्रेसची सत्ता आहे. मुंबई आणि दिल्लीत कॉंग्रेसचा एकही खासदार नाही.
कॉंग्रेसला जेव्हा जेव्हा स्पष्ट बहुमत मिळाले तेव्हा गांधी-नेहरू घराण्याकडेच नेतृत्व होते. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या करिष्म्याचा पक्षाने वापर करून घेतला. त्यामुळे पक्षाने नंतरही नेहरू-गांधी यांच्या करिष्म्याचा वापर करून घेतला. या तिघांनी पक्षाला निर्विवाद बहुमत मिळवून दिले. पण हे मान्यच करायला हवे की, सोनिया गांधी यांच्या करिष्म्याने पक्षाला कधीही पूर्ण बहुमत मिळवता आले नाही. सोनिया यांच्या अध्यक्षपदाच्या काळात पक्षाला सन 2009 मध्ये 204 जागांचा पल्ला गाठता आला. सन 2014 मध्ये तर सोनिया-राहुलचे नेतृत्व असताना पक्षाने कारकिर्दीतला नीचांक गाठला.
कॉंग्रेसने देशाला आजवर सहा पंतप्रधान दिले त्यातील तीन तर नेहरू-गांधी घराण्याचेच होते. अन्य तिघांमध्ये लालबहादूर शास्त्री, पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग या गांधी घराण्याबाहेरील नेत्यांना पंतप्रधान होता आले. शास्त्री, राव यांना स्वतंत्रपणे कारभार करता आला पण 10 वर्षे पंतप्रधानपदावर राहूनही डॉ. सिंग यांना सोनिया-राहुल यांच्या “रिमोट कंट्रोल’द्वारेच कारभार करावा लागला. “एका घराण्याचाच पक्ष’ अशी प्रतिमा झाल्याने व राज्यातील नेतृत्वाला वाढण्याची संधी न दिली गेल्याने, दीर्घकाळच्या सत्तेने आलेल्या सुस्तीमुळे पक्षाची वाढ खुरटली. निवडून येण्याची खात्री वाटल्याने सन 2014 नंतर सत्तेच्या मोहापायी अनेक नेत्यांनी भाजपचा रस्ता धरला. त्यामुळे पक्ष आणखीनच कमकुवत झाला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
देशाप्रमाणेच महाराष्ट्रातील कॉंग्रेसची स्थितीही फारशी वेगळी नाही. महाराष्ट्र हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु या किल्ल्याची आता पडझड झाली आहे. थोडेफार भग्न अवशेष शिल्लक आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत 12 निवडणुका झाल्या. त्यात एकेकाळी 288 पैकी 222 जागा जिंकणाऱ्या या पक्षाची अधोगती गेल्या निवडणुकीत अवघ्या 42 जागांपर्यंत येऊन पोहोचली आहे. हा पक्षाचा आजपर्यंतचा नीचांक आहे.
आजपर्यंतच्या 12 निवडणुकांत राज्यात कॉंग्रेसने पाचवेळा स्वबळावर पूर्ण बहुमत मिळविले, सन 1999 ते 2014 अशी तब्बल 15 वर्षे आघाडी सरकारचे नेतृत्व केले. राज्याच्या आजवरच्या 17 मुख्यमंत्र्यांपैकी 14 कॉंग्रेसचेच होते. अशी भक्कम पार्श्‍वभूमी असूनही हा पक्ष आता नीचांकी पातळीवर पोहोचलेला पहावयास मिळतो. सन 1972 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने राज्यातील 56 टक्के मते मिळविण्याचा विक्रम केला होता. हीच मते 2014 मध्ये अवघ्या 18 टक्‍क्‍यांवर येऊन पोहोचली आहेत.
महाराष्ट्रात कॉंग्रेसची घसरण कशी झाली हे दाखविणारी आकडेवारी कॉंग्रेसच्या अधोगतीचे चित्र स्पष्ट करते. निवडणूक वर्ष व (कंसात) मिळालेल्या जागा – 1962 (215), 1967 (203), 1972 (222), 1977 (69), 1985 (161), 1990 (141), 1995 (80), 1999 (75), 2004 (69), 2009 (82), 2014 (44) यावरून असेही लक्षात येते की कॉंग्रेस पक्षाला 1995 पासून म्हणजे 23 वर्षात एकदाही तीन आकडी जागा मिळू शकलेल्या नाहीत.
भक्कम संघटनेचा अभाव, गटबाजी आणि पक्ष पुन्हा उभा करण्यासाठीच्या प्रयत्नांचा अभाव ही पक्षाच्या घरंगळीची प्रमुख कारणे दिसतात. पराभवामागून पराभवानंतरही त्यात लक्षणीय सुधारणा दिसत नाही. आता पक्षाला 2014 पेक्षा चांगले यश मिळालेच, तर त्याचे श्रेय विद्यमान सरकारविरुद्धच्या असंतोषाला अधिक द्यावे लागेल, हे नक्की!
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)