झोपडपट्ट्यांच्या विकासाची “ब्लु प्रिंट’ तयार करा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची “स्मार्ट सिटी’मध्ये निवड झाली असल्याने शहराबरोबर सर्व झोपडपट्ट्यांचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी “ब्लु प्रिंट’ तयार करण्याची मागणी भाजपचे निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिका कार्यक्षेत्रात एकुण 71 झोपडपट्ट्या आहेत. शहरात 5 ठिकाणी शासनाची जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण योजना (जेएनएनयुआरएम) व घरकुल योजना राबविण्यात आली होती. त्यामुळे घरे नसलेल्या हजारो नागरिकांना अल्पदरात घरे मिळाली होती. त्यात महापालिका व तत्कालीन राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांनी यात आर्थिक गैरव्यवहार करत चुकीच्या गोष्टी केल्या. त्यामुळे न्यायप्रविष्ट बाब उद्‌भवल्याने हा प्रकल्पच बंद करण्यात आला. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने आवास अंतर्गत घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सद्यस्थितीमध्ये शहरातील झोपडपट्ट्यांमधील 75 टक्के लोकांनी आपल्या घराच्या जागेवरच पक्की घरे बांधली आहेत. त्यामुळे 99 टक्के लोकांची दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची इच्छाच नसते. त्यामुळे एवढ्या लोकांचा विरोध पत्करण्यापेक्षा आहे त्या जागेवर घरे बांधण्यासाठी महापालिकेने अर्थसहाय्य करावे अथवा कर्जप्रकरणाद्वारे सहाय्य करण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक झोपडपट्टीच्या विकासाची “ब्लु प्रिंट’ तयार करावी, झोपडपट्टीमध्ये सुशोभिकरणासाठी वेगळे पथक तयार करावे, झोपडपट्टी स्वच्छ, सुंदर व हरित करणाऱ्या कार्यक्षम नगरसेवकांना महापालिकेतर्फे उत्कृष्ठ नगरसेवक पुरस्कार देण्यात यावा, स्वच्छ व सुंदर असणाऱ्या झोपडपट्टीचा सन्मान करावा. झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी समिती स्थापन करून करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शहरातील झोपडपट्ट्यांची सद्यस्थिती
– अघोषित झोपडपट्ट्या – 34
– घोषित झोपडपट्ट्या – 37
– एम.आय.डी.सी.च्या जागेवरील झोपडपट्ट्या – 16
– सरकारी जागेवरील झोपडपट्ट्या – 16
– खासगी जागेवरील झोपडपट्ट्या – 25
– प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्या – 8
– महापालिका जागेवरील झोपडपट्ट्या – 6

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)