ब्रातिस्लावा – स्लोवाकीयाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. भ्रष्टाचार विरोधात काम करणाऱ्या आणि पेशाने वकील असलेल्या 45 वर्षीय झुनाना कॅप्यूटोवा यांची अध्यक्षा म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे झुनाना यांना राजकारणाचा काहीही अनुभव नाही. या उलट त्यांचे प्रतिस्पर्धी मार्केस सेफ्फोविक हे राजकारणात अगदी मुरलेले ज्येष्ठ नेते आहेत. मार्कोस हे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार होते तर झुनाना यांनी ही निवडणूक 10 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या प्रोग्रेसिव स्लोवाकिया पक्षातर्फे लढविली. या पक्षाचा पार्लमेंटमध्ये एकही सदस्य नाही.
झुनाना यांना 58 टक्के मते मिळाली तर प्रतिस्पर्धी मार्केस यांना 42 टक्के मते मिळाली. या देशात 40 लाख मतदार आहेत. झुनाना यांनी विजयी झाल्यावर शनिवारी रात्री केलेल्या भाषणात मतदारांचे आभार मानताना हा दुष्टांवर सुष्टांचा विजय असल्याचे सांगितले. झुनाना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्यामागे मुख्य कारण जॅन कुसिनेक या पत्रकाराची हत्या हे होते. जॅन सातत्याने गुन्हेगारी आणि राजकारण याच्यातील संबंधाविषयी लिहित होता. फेब्रुवारीत त्याला गोळ्या घातल्या गेल्या होत्या.
झुनाना यांनी अवैध कचराकुंडी प्रकरणात 14 वर्षे एक दावा चालवला होत. या दाव्यामुळे त्या चर्चेत होत्या. या देशात गर्भपात आणि समलैंगिक विवाह या संदर्भात ठोस कायदा नाही मात्र हे दोन्ही प्रकार येथे मान्य नाहीत. तरीही झुनानी यांनी मात्र या दोन्ही गोष्टींसाठी नेहमीच समर्थन दिले होते त्यामुळे त्यांच्यावर चर्च कडून नेहमीच टीका केली जात होती. झुनाना यांचा शपथविधी 15 जून रोजी होणार आहे असे समजते.