झारगडवाडीत प्रशासनाची “दबंग’ कारवाई

डोर्लेवाडी- झारगडवाडी गायरान क्षेत्रातील अतिक्रमणच बळकावले या मथळ्याखाली दैनिक प्रभातने (दि. 27) बातमी प्रसिद्ध केली होती. आज (दि.29) प्रभातच्या बातमीची दखल घेत बारामतीचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी झारगडवाडीत मोठ्या पोलीस ताफ्यात दबंग स्टाईलने प्रवेश करीत गावातील अवैध धंद्यांवर कारवाई केली. प्रांताधिकाऱ्यांनी अतिक्रमणांची पाहणी केली. याकारवाईमुळे गावात उडाली आहे.
बारामती तालुक्‍यातील खासगी सावकारकी विरोधात कडक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता प्रशासनाने अवैध दारू धंद्याविरोधात मोहीम तीव्र केली आहे. आज (दि.29) प्रांताधिकारी, तहसिलदार, राज्य उत्पादन शुल्क व बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करून पिंपळी येथील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्यावर छापा टाकून अंदाजे 3000 लिटर तयार रसायनासह इतर साहित्य नष्ट केले आहे.
झारगडवाडी (ता. बारामती) येथील गायरान जागेवरील अतिक्रमण व अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करण्यासाठी बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार हनुमंत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी शोभा लांडगे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पोरे व पोलीस पथक गावात आले.
मात्र, गावात एकाही व्यावसायिकाकडे मुद्देमाल सापडला नाही. पिंपळी येथील इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणत हातभट्टी दारू तयार केली जाते, अशी माहिती मिळाली होती. त्याठीकाणी पथकाने मोर्चा वळवला. अत्यंत सावधपणे धाड टाकल्यानंतर याठिकाणी हातभट्टी तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु होते. दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायनाचे 200 लिटरचे मोठे 14 बॅरेल भरले होते. तसेच इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात होते. ते सर्व रसायन व साहित्य प्रांत अधिकारी हेमंत निकम यांच्या सूचनेवरून जाळून नष्ट करण्यात आले. यावेळी पिंपळीचे माजी सरपंच नितीन देवकाते, पोलीस पाटील मोहन बनकर, पोलीस हवालदार संतोष मखरे, युवराज चव्हाण, नंदू जाधव आदी उपस्थित होते. बारामती पोलीस स्टेशन मध्ये उषा उर्फ अलका शशिकांत पवार, शशिकांत पवार व प्रिया शशिकांत पवार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • शासकीय जागांवर अतिक्रमण करून हातभट्टी सुरू केली जाते. यातून प्रशासन तसेच ग्रामस्थांनाही याचा उपद्रव होतो. यामुळे प्रशासनाकडून पुढेही अशाच प्रकारे संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्‍यात एकाही ठिकाणी हातभट्टी चालू देणार नाही.
    – हेमंत निकम, प्रांताधिकारी
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)