- छायाचित्र सक्तीचे : महापालिका, पुणे मेट्रोला समितीच्या सूचना
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात खासगी बांधकाम व्यावसायिक झाडे तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अर्ज करतात. त्यांना संबंधित झाडांचे छायाचित्र सादर करण्याची अट आहे. मात्र, ती अट पालिका, सरकारी व शासकीय संस्था व कार्यालयांना नाही. त्यांनाही छायाचित्राची सक्ती करण्यात आली आहे. छायाचित्रे नसल्याने पालिकेच्या स्थापत्य, बीआरटीएस आणि पुणे मेट्रोचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीने फेटाळून लावला आहे.
समितीची बैठक मंगळवारी (दि.24) झाली. या वेळी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सदस्य विलास मडिगेरी, शीतल शिंदे, श्याम लांडे, संभाजी बारणे, सदस्या साधना मळेकर, डॉ. वैशाली घोडेकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, एन. डी. गायकवाड, डी. एन. गायकवाड आदी उपस्थित होते.
खासगी बांधकामांसाठी अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्याच्या परवानगी अर्जासोबत संबंधित झाडाचे छायाचित्रे जोडणे सक्तीचे केले आहे. मात्र, पालिकेचे विभाग तसेच, सहकारी व शासकीय संस्था व कार्यालये सदर अर्जासोबत झाडांचे छायाचित्रे सादर करीत नाहीत. त्यामुळे समितीने ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता विभागाने 6 झाडे, ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या उपअभियंता विभागाने 24 झाडे व कार्यकारी अभियंता विभागाने 178 झाडे कापण्यासाठी अर्ज केला होता. चिंचवड- काळेवाडी पुल ते भाटनगर एसटीपी प्लॅन्टपर्यंतचा रस्त्याचे 18 मीटर रूंदीकरणासाठीव 178 झाडे तोडण्यात येणार आहे.
तसेच, पुणे मेट्रोच्या कामासाठी मोरवाडीतील मॉलसमोरील 5 झाडे तोडणे तसेच, 24 झाडांचे पुनर्रोपणाचा अर्ज होते. या सर्वांच्या अर्जासोबत छायाचित्र नसल्याने ते अर्ज फेटाळण्यात आले आहेत. या पुढे त्यांना छायाचित्रासह अर्ज भरण्याचा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
सिक्कीम दौरा अखेर रद्द
समितीच्या 20 सदस्यांचा सिक्कीम दौरा 3 ते 8 मे या कालावधीत सिक्कीम दौरा आयोजित करण्यात आला होता. एकूण 9 लाख 53 हजार खर्च होता. त्या खर्चास स्थायी समितीने गेल्या बुधवारी (दि.18) आयत्या वेळी मान्यता दिली. दौऱ्यास अनेक सदस्यांनी नकार दिल्याने समितीने दौऱ्याच रद्द केला आहे. या संदर्भात सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले की, दौऱ्याच्या खर्चावरून शहरभरातून टीका होऊ लागल्याने आणि पालिकेने बचतीने धोरण स्वीकारल्याने दौरा रद्द केला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा