- पारगावच्या सरपंचांची वनविभागाकडे मागणी
पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली आहे. झाडांची तोड करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बबनराव ढोबळे यांनी वनविभागाकडे केली आहे.
ग्रामपंचायतीने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावठाणमधील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गट नंबर 403 क्षेत्रात ग्रामपंचायतीने 10 वर्षांपासून वड, पिंपळ, जांभूळ, आंबा, बांबू, व इतर झाडे लावलेली आहेत. या क्षेत्रातून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे. 30 गुंठे क्षेत्रात गावची सार्वजनिक स्मशानभूमी आहे. या क्षेत्रात लहान मोठी एकूण 50ते 60 झाडे आहेत. ही झाडे या व्यक्तीने विनापरवाना तोडली आहेत. तसेच लहान मोठ्या झाडांची साल काढून ही झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या रस्त्याला ग्रामपंचायतीने रस्त्यासाठी आणि झाडांसाठी कुंपण केलेले होते. ते सुद्धा या व्यक्तीने काढून टाकलेले आहे. या व्यक्तीमुळे संपूर्ण झाडांना धोका निर्माण झाला आहे. राहिलेली झाडे ही व्यक्ती सतत तोडत आहे. तरी या व्यक्तीवर वनविभागाने तातडीने कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीने केली आहे.