झाडूवाला बनला “डॉक्‍टर’

महापालिकेच्या कर्मचाऱ्याने घडविला इतिहास

सुनील राऊत
पुणे  : सरकारी नोकरी मिळाली की कोणीही पुढे शिक्षण घेण्याच्या नादी लागत नाही. मात्र, महापालिकेचा एक झाडूवाला कर्मचारी याला अपवाद ठरला असून रात्रीच्या वेळी काम करून दिवसा या झाडूवाल्याने शिक्षण घेत चक्क डॉक्‍टरकी पास केली आहे. डॉ. तुषार अडागळे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तीन वर्षापूर्वी डॉक़्टर झालेला तुषार आजही महापालिकेत झाडूवाला म्हणूनच काम करत आहे. त्यामुळे तुषारच्या या दैदिप्यमान यशाचा आदर्श अनेक युवकांना प्रेरणादायी ठरणार आहे.
मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील करकंब या गावचे तुषारचे कुटूंब 50 ते 60 वर्षापूर्वी पुण्यात स्थायिक झाले.तुषारची आजी महापालिकेत झाडूवाला म्हणून कार्यरत होत्या. लहानपणीच आई गेलेल्या तुषारची जबाबदारी वडीलांनी सांभाळली. आजीच्या मृत्युनंतर डॉ. तुषार महापालिकेत 2008 मध्ये झाडूवाला या पदावर वारसा हक्काने नोकरीस रुजू झाले. कायम स्वरूपी शासकीय नोकरी मिळाल्याने तुषारच्या कुटूंबिय खुश होते. मात्र, या वर्षी तुषार डॉ. डी.वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडीसिन ऍन्ड सर्जरी (बीएचएमएस)ला पहिला वर्षाचे शिक्षण घेत होता. झाडूवाला म्हणटले की रोजचे झाडणकाम तसेच कचरा उचलण्याचे काम मात्र, डॉ. तुषार हे काम कोणत्याही कुरबुरू विना करत होता. मात्र, त्याच वेळी डॉक्‍टरकीचे शिक्षण पूर्ण करण्याची सुप्त इच्छा त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. त्यामुळे त्याने आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याला नशिबाची साथही मिऴाली.2008 मध्येच उरूळी देवाची येथील कचरा डेपोचे आंदोलन अधिक तीव्र झाले असल्याने कर्मचाऱ्यांना तीन शिफ्ट मध्ये काम करावे लागत होते.

 

डॉ. तुषारने डॉक़्टर होण्याचे स्वप्न 2015 मध्ये पूर्ण केले असले तरी, तो अद्याप महापालिकेत झाडूवाला म्हणूनच काम करत आहे. शासकीय सेवेत असताना, कोणत्याही कर्मचाऱ्याला इतरत्र सेवा करता येत नसल्याने डॉ. तुषारला रूग़्नसेवेची इच्छा असूनही प्रक्‍टीस करता आलेली नाही. मात्र, आता त्याला आपली सेवा गोरगरिबांसाठी करायची असल्याने आपल्या शिक्षणानुसार, महापालिकेच्या रूग्णालयात डॉक्‍टर म्हणून आपली सेवा बजवायाची असल्याचे तो सांगतो.

याचा फायदा घेत तुषारने रात्रीची शिफ्ट निवडली त्यात रात्री दहा ते सकाळी दहा पर्यंत तो स्वच्छतेचे काम करायचा आणि त्यानंतर सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत तो डॉक्‍टरकीचे शिक्षण घ्यायचा. हा त्याचा प्रवास 2015 पर्यंत सुरू होता.त्यामुळे साडेपाच वर्षांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यास आणखी दोन वर्षे लागली. कामामुळे अनेकदा परिक्षेला तसेच इतर कारणास्तव वेळ न मिळाल्याने त्याला बीएचएमएसचे शिक्षण पूर्ण करण्यास वेळ लागला. मात्र, त्याने अखेर इच्छाशक्तीच्या जोरावर 15 ऑक्‍टोबर 2015 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदविला गवसणी घातल डॉक़्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

दरम्यान, डॉ. तुषारच्या या यशाची माहीती दैनिक प्रभातच्या बातमीदाराकडून मिळताच, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी डॉ. तुषार यांना कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कार केला. तसेच शासनाचे नियम आणि महापालिकेच्या धोरणानुसार, त्यांना डॉक़्टर म्हणून आरोग्य विभागाच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचे मोळक यांनी प्रभातशी बोलताना सांगितले. उपायुक्त विलास कानडे यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.