ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ हार्मोनियम वादक व पद्मश्री विजेते पं. तुळशीदास बोरकर (84) यांचे शनिवारी निधन झाले. मुंबई येथील नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सोलो हार्मोनियम वादनातील एक आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

पंडित तुळशीदास बोरकर हे गेल्या काही दिवसांपासून हार्नियाच्या त्रासाने त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंबर पंधरा दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना टीबी झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार असताना  अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोव्यातील बोरी या गावामध्ये 18 नोव्हेंबर 1934 साली तुळशीदास बोरकर यांचा जन्म झाला होता. मात्र ते गोवा सोडून पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांनी मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे धडे गिरविली. त्यासाठी त्यांना रोज मुंबई-पुणे असा प्रवास करावा लागत असे. विशेष म्हणजे त्यांना या कारकिर्दीत उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना साथ केली. शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल 2016 साली त्यांना “पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

दरम्यान, तुळशीदास बोरकर यांच्या निधनावर अनेक स्तरामधून शोक व्यक्त करण्यात येत असून सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. पद्मश्री पुरस्कार आणि वाद्य संगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेले गोव्याचे ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडीत तुळशीदास बोरकर यांच्या निधनाने संगीतातला एक स्वर निखळला आहे, असे मंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)