ग्रामविकास मंत्री मुश्रीफ ः निराधार योजनेची पेन्शन योजना पुन्हा सुरु करू
कोल्हापूर – 65 वर्षावरील ज्येष्ठ स्त्री-पुरुषांना उतारवयात मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान दुप्पट करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे केली.
राज्य शासनाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनाच्या राज्यव्यापी महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते. महिला व बाल विकास मंत्री ऍड. ठाकूर यांनी सुरुवातीलाच कविता वाचन करुन महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.
मुश्रीफ म्हणाले, 65 वर्षांवरील ज्येष्ठांचा मदतनिधी मासिक एक हजार रुपयांवरुन दुप्पट म्हणजे दोन हजार रुपयांपर्यंत वाढवला जाणार आहे.
मागील पाच वर्षांत बंद झालेल्या निराधार योजनेची पेन्शन योजना सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 21 हजारांवरुन 50 हजार रुपये करण्यात येईल. महापूरग्रस्त महिलांनी मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांच्याकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
शासकीय रिक्त जागेची मेगा भरती सुरु होणार असून महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे, अशा घोषणा करून त्यांनी महिलांना महिला दिनाची भेट दिली. तसेच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिलांना बरोबर घेतले नाही म्हणून आशिया खंडातील देश मागे राहिले. महिलांना या आधीच सोबत घेतले असते तर देश महासत्ता झाला असता. यापुढे भविष्यात ती भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि संसद, विधानसभेत आरक्षण द्यावे लागेल. बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यामध्ये दुधाच्या पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील. महिलांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे.
आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महिला सुरक्षा कायदा केला जाईल. त्याचबरोबर आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल याबाबतही कायदा करु, असे त्यांनी सांगितले.
यावेळी एका मुलीवर अथवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांना ताराराणी प्राधान्य कार्डचे वाटप, विविध महिला स्वयंसहाय्यता समुहांना सीआयएफ तसेच विविध राष्ट्रीयकृत बॅंकांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.