ज्येष्ठांचा विराम

– प्रा. पोपट नाईकनवरे, राज्यशास्त्र अभ्यासक

यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ नेते सक्रिय राजकारणापासून दूर जाताना दिसत आहेत. भाजपचे सर्वांत ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यावेळी निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहेत. 91 वर्षांच्या आडवाणींच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्याऐवजी अमित शहा रिंगणात असतील. गेल्या निवडणुकीत वाराणशीऐवजी कानपूरमधून लढणारे आणि निवडणूक जिंकणारे डॉ. मुरली मनोहर जोशी आज 85 वर्षांचे आहेत आणि त्यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याचे सांगितले आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा मतदारसंघातून 85 वर्षांचे माजी मुख्यमंत्री शांताकुमारही यावेळी निवडणूक रिंगणात नसतील, असे संकेत मिळत आहेत. त्यांनीही निवडणूक लढविण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये रस्ते आणि परिवहन मंत्रालयाचा कार्यभार सांभाळलेले 84 वर्षांचे बी. सी. खंडुरी यांनाही यावेळी तिकीट मिळालेले नाही. बिहारमधील 79 वर्षांचे ज्येष्ठ नेते हुकूमदेव नारायण यादव यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव अशोक यादव यांना तिकीट देण्यात आले आहे.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोशियारी सध्या 76 वर्षांचे असून, त्यांनाही यावेळी तिकीट देण्यात आलेले नाही. झारखंडमधील ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा हेही आता 82 वर्षांचे असून, सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. माजी मंत्री यशवंत सिन्हा सध्या 81 वर्षांचे असून, मोदी-शहा यांच्यावर टीकेची झोड उठविल्यामुळे ते स्वतःच भाजपच्या राजकारणात एकटे पडले आहेत. मोदींवर टीका करणारे 72 वर्षांचे शत्रुघ्न सिन्हा यांनाही पक्षाने बाहेरचा रस्ता दाखविला असून, पटना साहिब मतदारसंघातून त्यांना तिकीट दिलेले नाही. तेथून 64 वर्षांचे रविशंकर प्रसाद भाजपच्या वतीने निवडणूक लढविणार आहेत. मोदी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने शत्रुघ्न सिन्हा इतके संतापले की त्यांनी मोदींवर खुलेपणाने टीकास्त्रे डागायला सुरुवात केली. ते कधी लालूप्रसाद यादवांसोबत, कधी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत तर कधी ममता बॅनर्जींसोबत मंचावर दिसतात. आता ते कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवीत असल्याचे वृत्त आहे.

सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही वयाची पंच्याहत्तरी ओलांडली असून, त्यांच्याबाबतही अशाच प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्या इंदौरमधून निवडणूक जिंकल्या आहेत. पंच्याहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांच्या ऐवजी नव्या नेत्यांना संधी देण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूचनांची भाजपकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे, असेही बोलले जाते. 77 वर्षांच्या कलराज मिश्र यांनाही हाच नियम लागू करण्यात आला आहे. 87 वर्षांचे कल्याणसिंह राजस्थानचे राज्यपाल असून, सक्रिय राजकारणातून ते केव्हाच दूर झाले आहेत.

या हालचाली केवळ भाजपमध्येच घडत आहेत असेही नाही. राजकारणात प्रदीर्घ इनिंग खेळलेले इतर छोट्या-मोठ्या स्थानिक पक्षांचे नेतेही कदाचित यावेळी अखेरची निवडणूक लढवतील. यातील काही नेते असे आहेत, ज्यांनी आपला राजकीय वारसा पुढील पिढीकडे सुपूर्द केलाही आहे. काहीजण पुढील पिढीला तयार करीत आहेत. अखिलेश यादव यांच्यासारख्या काही नेत्यांनी ज्येष्ठ पिढीला स्वतःच दूर ठेवले आहे. 79 वर्षांचे मुलायमसिंह यादव कदाचित यावर्षी निवडणूक रिंगणात आहेत; परंतु त्यांच्या मतानुसार समाजवादी पक्षात आता निर्णय होत नाहीत. महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 78 वर्षांचे असून, निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय त्यांनी पूर्वीच जाहीर केला होता. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपले नाव जाहीर केले होते; मात्र नंतर माघार घेतली. त्यांचा राजकीय वारसा पुढे चालविणाऱ्या त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि नातू पार्थ पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

हरियाणासारख्या राज्यातील राजकारण एके काळी देवीलाल, बन्सीलाल, भजनलाल या ज्येष्ठ नेत्यांच्या भोवती फिरत असे. आता या तिघांच्या अनुपस्थितीत राजकारण बदलले आहे. देवीलाल यांचे चिरंजीव ओमप्रकाश चौताला हेही 84 वर्षांचे असून, यावेळी ते जेबीसी भरती गैरव्यवहार प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा भोगत आहेत. भूपेंद्रसिंह हुड्डा यांचेही वय 71 वर्षांचे असून, बऱ्याच खटपटींनंतर त्यांना निवडणूक अभियान समितीचे संयोजकपद देण्यात आले आहे. परंतु, ते निवडणूक मात्र लढविणार नाहीत. तीन वेळा खासदार झालेले त्यांचे चिरंजीव दीपेन्द्रसिंह हुड्डा हेच यावेळी रोहतकमधून कॉंग्रेसकडून रिंगणात असतील.

तमिळनाडूत जयललिता आणि एम. करुणानिधी या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांचे निधन झाल्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्‍वभूमीवर तिथे होत असलेल्या या पहिल्याच निवडणुका आहेत. जे. जयललिता यांचा राजकीय वारसदार कोण, याविषयी संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे, करुणानिधी यांचे चिरंजीव एम. के. स्टॅलिन यांना त्यांचा राजकीय वारसदार म्हणून घोषित करण्यात आले आहे. कर्नाटकात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पा 76 वर्षांचे झाले असून, ते निवडणूक लढविणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा 85 वर्षांचे आहेत. या वयात निवडणूक लढविणे आणि लोकांसमवेत सक्रिय काम करणे त्यांना शक्‍य नाही. कॉंग्रेसचा विचार करायचा झाल्यास वयस्क नेत्यांची लांबलचक यादी पाहायला मिळेल. 86 वर्षांचे डॉ. मनमोहन सिंग, 90 वर्षांचे मोतीलाल व्होरा, 76 वर्षांच्या अंबिका सोनी, 78 वर्षांचे ए. के. अँटनी अशी बरीच नावे या यादीत आहेत. परंतु 72 वर्षांच्या सोनिया गांधी वगळता सत्तरी ओलांडलेले अन्य नेते यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे वाटत नाही. सोनिया गांधीही प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे काही वर्षांपासून निवडणुकीच्या प्रचारापासून दूर आहेत. अन्य पक्षांच्या नेत्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव 70 वर्षांचे असून, यावेळी पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवून लोकसभेत पाऊल टाकण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हेही बरेच वयस्कर आहेत. सध्या ते 81 वर्षांचे असले, तरी ते मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे अपेक्षित मानण्यात येते. जम्मू-काश्‍मीरमधील चार जागांवर त्यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष लढत असून, दोन जागा कॉंग्रेस लढवीत आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद लोकसभेची निवडणूक लढविणार का, याचा निर्णयही कॉंग्रेसला घ्यावा लागणार आहे. 1949 मध्ये जन्मलेले आझाद हेसुद्धा सत्तरी ओलांडणारे नेते आहेत.

भारतीय राजकारणात अनेक वर्षे पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या नेत्यांमधील अनेकजण असे आहेत, जे पुढील निवडणूक लढविणेच नव्हे तर त्या निवडणुकीत काही योगदान देण्यासही समर्थ नाहीत. त्यांच्यासाठी यावर्षीच्या निवडणुकाच शेवटच्या ठरण्याची शक्‍यता आहे. यातील काही नेते तर असे आहेत, जे सध्याच्या राजकीय वातावरणात सामावलेही जाऊ शकत नाहीत. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून अनेक ज्येष्ठ नेते राजकारणाची सूत्रे पडद्यामागूनच हलवीत आहेत. राजकारणातील एक पिढी अस्तंगत होत असून, पुढील पिढीचा उदय होत आहे, असेही या विवेचनावरून म्हणता येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.