जैश-ए-महंमदच्या चार दहशतवाद्यांचा खातमा

जम्मू-काश्‍मीरमधील घटना: दोन सुरक्षा जवान शहीद
श्रीनगर जम्मू-काश्‍मीरमध्ये आज झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खातमा केला. मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-महंमद या पाकिस्तानस्थित संघटनेचे सदस्य होते. दरम्यान, चकमकीत दोन सुरक्षा जवान शहीद झाले.

पुलवामा जिल्ह्याच्या त्राल भागातील लाम जंगलात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती गुप्तचरांनी सुरक्षा दलांना पुरवली. त्यानंतर पोलीस दल आणि लष्कराने दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेवेळी सुरक्षा जवान आणि दहशतवादी आमनेसामने आले. त्यामुळे झालेल्या चकमकीत प्रारंभी एक पोलीस आणि एक जवान असे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने श्रीनगरमधील रूग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने जखमी अवस्थेत त्यांचे निधन झाले. शिपाई अजयकुमार आणि कॉन्स्टेबल लतिफ गुजरी अशी शहिदांची नावे आहेत.

दरम्यान, सुरक्षा जवानांनी चकमकीदरम्यान दहशतवाद्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामध्ये चार दहशतवादी मारले गेले. त्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही. मात्र, मृत दहशतवाद्यांपैकी दोघे परदेशी नागरिक असल्याचा अंदाज आहे. चकमकस्थळावरून सुरक्षा जवानांनी मृत दहशतवाद्यांकडील शस्त्रास्त्रे जप्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणात इतर दारूगोळाही जप्त करण्यात आला. पुलवामामधील चकमकीतील चार दहशतवाद्यांचा खातमा म्हणजे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. मागील काही काळापासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार मोहिमा हाती घेतल्या आहेत.

त्यामध्ये दहशतवादी संघटनांना जबर हादरा बसला आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांना इतर आघाड्यांवरही लढावे लागत आहे. त्यामध्ये सीमेपलिकडून भारतीय हद्दीत होणारे दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न आणि सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांकडूून होणारा शस्त्रसंधीचा भंग आदींचा समावेश आहे. मात्र, ही आव्हानेही सतर्क आणि सज्ज असलेली भारतीय सुरक्षा दले यशस्वीपणे परतावून लावत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)