जैवविविधता संवर्धन बैठकीच्यादिवशीच पवनात मृत माशांचा खच

पिंपरी –पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील जैवविविधता संवर्धनासाठी महापालिका मुख्यालयात बैठक आयोजित केली होती. याच दिवशी पवना नदीच्या पात्रात मृत मासे आढळून आले. या प्रकाराबद्दल पर्यावरणप्रमींनी चिंता व्यक्‍त केली आहे.

शहरातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जैवविविधतेचे प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड शहरासाठी लोकांची जैवविविधता नोंदवही बनवणे, शहराच्या जैवविविधतेच्या निर्देशांकाचे मुल्यांकन करणे आणि स्थानिक जैवविविधता धोरण आणि कृती योजना तयार करणे, अशी कामे मुंबई येथील टेराकॉन इकोटेक प्रा.लि. या संस्थेमार्फत करण्यात येणार आहेत.या विषयांच्या संक्षिप्त परिचयासाठी याबाबतची बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.

ही बैठक सुरु असतानाच, थेरगाव येथील पवना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी हे मासे नदीपात्राबाहेर काढले. मात्र, नदीपात्रातील जलपर्णीमध्ये अडकलेल्या माशांमुळे मोठी दुर्गंधी पसरली होती.

नदीपत्रात मृथ मासे आढळलेल्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले असून प्रयोगशाळेत तपासणीला दिले आहेत. प्रदुषण नियंत्रण मंडळाला देखील याची कल्पना दिली असून पाण्यात रसायन मिसळले आहे की नाही, ही बाब तपासणत उघडकीस येईल. मासेमारी करणारे अनेक जण छोटे मासे फेकून देतात. फेकून दिलेले छोटे मासे मृथ झाले असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
संजय कुलकर्णी,
कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Leave A Reply

Your email address will not be published.