जे लोकप्रतिनिधी, प्रशासनाला जमलं नाही ते ग्रामस्थांनी करून दाखविले!

सांगवी (ता. मावळ) : जीर्ण धोकादायक पुलाचे संरक्षक कठडे व बराचसा भाग कोसळल्याने ग्रामस्थांनी स्वखर्चातून सिमेंट पाईपची खरेदी करून मोरी टाकून पर्यायी मार्ग बनविला.
  • ग्रामस्थांच्या पुढाकारातून धोकादायक पुलाला पर्यायी मार्ग

वडगाव मावळ – सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील जीर्ण धोकादायक पुलाचा संरक्षण कठड्याचा बराचसा भाग बुधवारी (दि. 25) रात्री आठच्या सुमारास कोसळल्याने तो पूल मृत्यूचा सापळा झाला. त्यामुळे कुंभकर्णी निद्रेत असलेल्या प्रशासनाची वाट न पाहता, युवक व ज्येष्ठांनी तसेच जांभूळ-सांगवी ग्रुप ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन रविवारी (दि. 29) रोजी सकाळी 16 मोऱ्या जेसीबीच्या सहाय्याने टाकून त्या पुलाला पर्यायी रस्ता तयार केला. पण ओढ्याला पाणी वाढल्यास बनविलेला रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्‍यता असल्याने पुलाची व रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांची केली.

मावळ तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या वडगाव-कातवी नगरपंचायतीला जोडणाऱ्या सांगवी-वडगाव रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पुलाचे दगडी बांधकाम पुणे जिल्हा परिषदेने 56 वर्षापूर्वी केले. या पुलाची अनेक वेळा तात्पुरती डागडुजी केली. त्यातच मावळात सुरु असलेल्या संततधार पावसाने जीर्ण धोकादायक पुलाचे संरक्षक कठडे व पुलाचा बराचसा भाग कोसळला आहे. पूल इतका जीर्ण झाला असून कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. या मार्गावर खापरे ओढ्याचे मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहत असून, धोकादायक जीर्ण पुलावरून ये-जा करताना सांगवी येथील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असल्याने ते विद्यार्थी वडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकण्यासाठी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पुलावरून विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी व ग्रामस्थांच्या दुचाकी व चारचाकींची वर्दळ सुरु असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सांगवी गावाच्या दळणवळणाचा एकमेव मार्ग असल्याने प्रशासनाला केव्हा जाग येईल यांची प्रतीक्षा न करता, रविवारी (दि. 29) युवा कार्यकर्ते सचिन पगडे, दिनेश पगडे, दिनेश पगडे, सुधाकर लालगुडे, माजी उपसरपंच काशिनाथ तोडकर, स्वप्नील खांदवे, शरद खांदवे, सुनील खांदवे, दशरथ खांदवे, जालिंदर तोडकर, सागर खांदवे, भास्कर खांदवे, वदन खांदवे, तानाजी खांदवे व इतर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून 46 हजार रुपये खर्चुन मोरीसाठी मोठ्या आकाराच्या आठ सिमेंट पाइपची खरेदी केली. ग्रामपंचायतीच्या वतीने छोट्या आकाराचे सहा पाईप असे एकूण 14 मोऱ्या उद्योजक सचिन पगडे यांच्या जेसीबीच्या सहाय्याने टाकून डबर व मुरूम टाकून पर्यायी रस्ता तयार केला. जे प्रशासनाला जमले नाही ते ग्रामस्थांनी करून दाखविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)