जेजुरी देवसंस्थानच्या वतीने शंभर रुपयात डायलेसिस

जेजुरी – येथील श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी डायलेसिस अँड डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी फक्त 100 रुपयात डायलेसिस सुविधा देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे, अशी माहिती विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे पाटील यांनी दिली. देवसंस्थानच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचा पुरंदर व आजूबाजूच्या तालुक्‍यातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.
सध्याच्या विश्वस्त मंडळाने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भक्त निवासाच्या इमारतीमध्ये सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची डायलेसिस व डायग्नोस्टिक सुविधा निर्माण केली आहे. 10 फेब्रुवारी रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते याचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी पवार पब्लिक ट्रष्टच्या वतीने 22 लाख रुपये खर्चाची अद्ययावत रुग्णवाहिका देवसंस्थानला प्रदान करण्यात आली होती. तालुक्‍यामध्ये डायलेसिसचे सुमारे दोन हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे ही सुविधा ग्रामीण भागात निर्माण करण्यात आली होती. त्यानुसार सुरुवातीला 500 रुपये फी आकारण्यात आली होती. आता फक्त 100 रुपये घेण्यात येणार आहेत. सध्या दरमहा 125 रुग्ण या सुविधेचा लाभ घेत असून त्यांना आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा डायलेसिस करावे लागते. याच सुविधेला पुणे किंवा इतर शहरात किमान दीड हजार रुपये खर्च येतो. मात्र, जेजुरीतच ही सुविधा केवळ 100 रुपयांत मिळत आहे, अशी माहिती डॉ. संजय खेडेकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.