जेजुरीच्या स्मशानभूमीत रंगले कवी संमेलन

जेजुरी- जेजुरीतील कैलासवैकुंठ स्मशानभूमीत विद्रोही कवींचा तरी आम्ही बोलू नये? हा कवितांचा कार्यक्रम तीन तास रंगला. जेष्ठ कवी आकाश सोनवणे, हनुमंत चांदगुडे, अनिल दीक्षित, हृदयमानव अशोक, सुमित गुणवंत, रविंद्र कांबळे आदी कवींनी रसिकांना कधी अंतर्मुख केले तर कधी पोटधरून हसायला लावले.
स्मशानभूमी म्हटले की, निस्तब्ध शांतता, तर शव दहन होताना आक्रोश, हुंदके असेच चित्र नेहमीचे चित्र. मात्र, मानवी जीवनातील शरीराला मोक्षप्राप्ती मिळणाऱ्या जेजुरीतील कैलास स्मशानभूमीत शुक्रवारी (दि. 27) साहित्यमार्तंड कै. यशवंतराव सावंत यांच्या स्मृतींना उजाळा देत माणूस हा केंद्रस्थानी मानत तरी आम्ही बोलू नये? हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बेडकाचे लग्न लावणाऱ्या, आंबा खाऊन पोरं जन्माला घालणाऱ्या आणि दगडाला थंडीताप भरला म्हणून तपासणाऱ्या देशात ही कविता सादर करीत कवि संमेलनाला सुरवात झाली. तुझ्या हातात लेखणी घे, पोराला शिकव, त्याच्या रक्तात फुले-शाहू-आंबेडकर रुजव, तुझ्या मिलनातून एक शिवाजी घडव अशी साद कवी सागर काकडे यांनी घातली.
विट्ठला, पायाखालचा चोखोबा आता वर यायला हवा, अन नामदेवाला आता मंदिरात घ्यायला हवा या कवितेने हनुमंत चांदगुडे यांनी विठ्ठलाला साकडे घातले. स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करताना कवी अनिल दीक्षित म्हणाले की, आग काळजाला लागली पाहिजे, लाज सूर्यालाही वाटली पाहिजे, वेळ येईल द्रौपदीसारखी, लेक गर्भातली वाचली पाहिजे या कवितेने रसिकांना अंतर्मुख केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, प्रा. वृषाली रणधीर, देवसंस्थानचे विश्वस्त पंकज निकुडे पाटील, एन. डी. जगताप, मेहबूब पानसरे, दत्ता भोंगळे, सुनील लोणकर, तानाजी झगडे, प्रकाश फाळके, विजयकुमार हरिशचन्द्रे, यशवंत दोडके, सतीश घाडगे, महेश म्हेत्रे, योगेश जगताप, समीर मोरे, बाबू मोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्री जगताप, संदीप जगताप, नितीन चंदनशिवे उपस्थित होते.
कार्यक्रमात नगरसेवक अरुण बारभाई, निलेश जगताप, डॉ. विनोदकुमार सिंह यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल पगडी, उपरणे, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विश्वस्त शिवराज झगडे, बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान जुनी जेजुरी यांच्या वतीने करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)