जीवनगाणे: तुझा विसर न व्हावा…

अरुण गोखले

आज मंदिरात हरिनाम सप्ताहाची सांगता होती. काल्याचं कीर्तन चालू होते. बुवा सांगत होते…
दु:ख देवाला सांगावे।
सुख देवासी मागावे।।
आपलं दु:ख हे जगाला न सांगता आपण ते देवालाच सांगायला हवे. कारण ते दूर करून तोच आपल्याला सुख देऊ शकतो. जगात इतर कोणी ते देणार नाही उलट लोक आपल्या दु:खाचे हसं करतील. त्यासाठी जे सांगायचं, जे मागायचं ते त्या एका परमेश्‍वराकडेच.
देवाकडे मागायचे हे जरी खरे असले तरी त्याच्याकडेही नेमके काय आणि कसे मागायचे? हे आपल्याला साधू संत आणि सत्पुरुष हेच योग्य पद्धतीने शिकवतात. ते म्हणतात की, बाबांनो! देवाकडे हेच मागणे मागा की देवा आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. तुझा आठव हा आमच्या मनात सदैव राहू दे.
माणसाचं काय आहे त्याला काही दु:ख झालं, त्याच्यावर काही संकट आलं, तो अडचणीत सापडला की त्याला देव आठवतो. अशा वेळी तो देवाचा धावा करतो. मठ, मंदिरात जातो. नवससायास करतो. पण तेच दु:ख अडचण, संकट, धोका दूर झालं की सुखाच्या वेळी मात्र त्याला देव आठवत नाही.
इथे संत हा बोध देतात की, बाबारे जीवनात दु:ख आलं की सर्वच जण देवाची आठवण करतात. त्याचा धावा करतात त्याला पूजतात, भजतात. पण जर आपण त्याच देवाची सुखातही आठवण ठेवली. जीवनातल सुख समाधान आनंद हे त्याचच देण आहे, असे मानले. त्यालाच भजले तर दु:ख ते येणारच कसे? आणि का?
यासाठीच देवाला आपण भजत गेलो, त्याला जीवनातल्या प्रत्येक सुखदु:खाचा साक्षीदार ठेवला आणि त्या देवाकडे जर त्याचा विसरच होऊ नये हीच मागणी केली तर ती अधिक रास्त होणार नाही का?
देवाकडे मागायचंच असेल तर त्याच्या स्मरणाची ठेव मागा. त्याचे नाव मुखी राहो हीच प्रार्थना करा. ईश्‍वराचे गुणगान, त्याचे ध्यान, नामस्मरण हीच तुमच्या जीवाची खरी आवडी व्हावी, असं मागणं त्याच्याकडे मागा.
त्याच्याकडे कोणत्याही ऐहिक सुख संपदेची, मोक्ष मुक्‍तीची मागणी करण्यापेक्षा त्याच्याकडे त्याच्या कृपेचा अक्षय ठेवा मागून घ्या. तो परमात्मा अक्षय अशा खऱ्या आणि शाश्‍वत सुखाचा दाता आहे. त्याचं प्रेम हीच आपल्या जगण्याची खरी संजीवनी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)