जीवनगाणे – चार गोष्टी… 

अरुण गोखले 

माणसाचा खरा धर्म कोणता? पाप कशाला म्हणावे? क्रोधाची परिणिती काय? आणि देवत्वाची नेमकी खूण कोणती? या चार प्रमुख गोष्टी आहेत. मानवी जीवनातल्या या महत्त्वाच्या गोष्टी का आणि कशासाठी आहेत, त्याचे मानवी जीवनातले मोल काय? या संदर्भात साधू, संत आणि सद्‌गुरू ह्यांची आपल्याला हीच शिकवण असते की, या जगात माणसांनी माणसांशी माणसाप्रमाणे वागणे हाच मानवाचा खरा मानवता धर्म आहे. पण समाजात अनेक वेळा त्याच्या हातूनच ह्या स्वधर्माचे योग्य असे पालन नाही तर उलट त्याचे उल्लंघन होत असताना दिसते. “मी’च्या अहं पोटी माणूस दुसऱ्या माणसाशी पशुवत वागताना, अविचार, अनीती, अधर्म, अत्याचार करताना दिसतो. तो इतरांच्या भावभावनांचा विचारच करत नाही. मग अशा वेळी मनात असा प्रश्‍न उभा राहतो की, यालाच का माणूस म्हणायचे?

माणसाच्या मनात जर इतरांबद्दल दया, करुणा आणि प्रेम असेल, तरच तो जर इतरांशी प्रेमाने आस्थेने, सहृदयतेने वागेल. त्याच्या हातून सर्वांचे कल्याण होईल. कळत नकळत का होईना अशा त्या मानवता धर्माचे पालन होईल. दया हेच मानवतेचे खरे लक्षण आहे. दया हेच त्याचे खरे भूषण आहे.

मानवी मनातील लोभ, स्वार्थ ह्या गोष्टीच त्याला अनीती, अधर्म आणि असत्याचरणाकडे प्रवृत्त करवतात. त्याच्या हातून पापकारक कृती घडवतात. त्याला दुराचारी करून पापाचे धनी बनवतात.

या स्वार्थ, लोभा इतकाच माणसाचा सर्वात मोठा आणखी एक शत्रू आहे तो म्हणजे क्रोध. क्रोधाचा अग्नी इतका भयानक असतो की, तो त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांचीच राख करून टाकतो. क्रोधानेच सगळ्या चांगल्या गोष्टींचा सर्वनाश घडतो. त्यासाठीच कबीरांचे असे म्हणणे आहे की, माणसाचाच पशू बनविणारे हे लोभ आणि क्रोध हे दुर्गुण त्याने प्रयत्नपूर्वक दूर ठेवले पाहिजेत.

या चारी गोष्टींचे नेमके वर्म कबीरांनी मोठ्या खुबीने आपल्याला दोह्यातून सांगितले आहे. माणूस हा देवाचाच एक अंश असं मानलं जात असताना माणसातल्या देवत्वाचे दर्शन हे कधी घडते? हे सांगताना कबीर सांगतात की, अपकारकर्त्यालाही जेव्हा माणूस क्षमा करतो. दुसऱ्याचे अपराध पोटी घालतो, आणि उदार अंत:करणाने जेव्हा तो इतरांना क्षमा करतो. त्या क्षमतेतच माणसातील देवत्वाचे दर्शन घडते. सर्वच माणसात देवत्वाचे गुण असतात असे नाही. देवत्वाचे गुण अंगीकारण्यासाठी माणसाला या चारही गोष्टींवर प्रभुत्व मिळवावे लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.