“जीएसटी’तून वगळल्याने राख्यांचे दर “जैसे थे’

पिंपरी – नारळी पौर्णिमेला अवघा एक महिना बाकी असला तरी, पिंपरीत राखी विक्रेत्यांची दुकाने राख्यांनी सजली आहेत. वस्तू व सेवा करातून (जीएसटी) वगळल्यामुळे राखीला दरवाढीची कोणतीही झळ बसली नसून यंदा राख्यांचे दर “जैसे थे’ आहेत. बालचमूंसाठी अत्यंत आकर्षक राख्या बाजारपेठेत आल्या असून त्यावर “कार्टून’चे वर्चस्व आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर राख्यांची होलसेल विक्री होते. किरकोळ विक्रेत्यांची राखी खरेदीसाठी गर्दी झाली आहे. राखी पौर्णिमेच्या तोंडावर दहा दिवस आधी शहरातील विविध भागांमध्ये राखी विक्रीचे स्टॉल लागतात. त्यासाठी आत्तापासूनच खरेदीला सुरुवात होत असते. दिल्ली, गुजरात, कलकत्ता, मुंबई येथून शहरात राख्या विक्रीसाठी येतात. शहरातील काही भागात राखी बनवण्याचा व्यवसाय देखील केला जातो. या ठिकाणच्या राख्या सध्या होलसेल विक्रेत्यांकडे विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाजारात यंदा राख्यांमध्ये विविध प्रकारच्या राख्या बघायला मिळत आहे. यामध्ये लहान मुलांसाठी कार्टून राख्यांनी वर्चस्व गाजवल्याचे चित्र दिसून येत आहे. “मोटू-पतलू’, “मिनियन्स’, “अँग्री बर्ड’, “पोकेमॅन’, “भीम’, “डोरेमॅन’, “बाहुबली’ आदी असंख्य कार्टून राख्यांचा त्यात समावेश आहे. लहान मुलांसाठी “स्पीनर राखी’ देखील खास आहे. राखीवर असलेल्या फिरत्या गोल चक्रामुळे “स्पीनर’ आणि राखी असा दोन्हींचा आनंद मुलांना लुटता येणार आहे, अशी माहिती राखी विक्रेते दिनेश चौधरी यांनी सांगितले.

मोठ्यांसाठी देखील विविध प्रकारच्या आकर्षक आणि विविध डिझाईनमध्ये राख्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये पारंपरिक असलेल्या देव राखींची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर कुंदन राखी, म्युझिक, लुंबा, चांदी, डायमंड, गोल्डन, कपल आणि श्री राखी देखील बाजारात दाखल झाल्या आहेत. यामध्ये असलेल्या म्युझीक आणि कपल राखीला यंदा जास्त मागणी असल्याची माहिती राखी गोपाल चौधरी यांनी दिली. राख्यांना “जीएसटी’च्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. परिणामी, यंदा राख्यांच्या दरामध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.

प्लॅस्टिक बंदीमुळे “पॅकींग’ला अडचणी
मोठ्या आकाराच्या स्पंजच्या राख्या कालबाह्य होत चालल्या आहेत. नाजुक दोरा राखी तसेच फॅन्सी राख्यांची मागील काही वर्षांपासून चलती आहे. ग्राहकांची ही गरज ओळखून खड्यांच्या नाजूक दोरा राख्या यंदा आकर्षण आहेत. कुंदन वर्कमधील राख्या महिला वर्गाच्या पसंतीस उतरत आहेत. “इको फ्रेंडली’ “वुडन राखी’ यंदाचे आकर्षण आहे. देवासाठी गोंडा राख्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होती. या राख्यांना मोती व मणी लावण्यात आल्याने त्या देखील आकर्षक दिसत आहेत. प्लॅस्टिक बंदीच्या पार्श्‍वभूमीवर डिझायनर राख्या आकर्षक कागदी बॉक्‍समध्ये “पॅकींग’ करण्यात आल्या आहेत. प्लॅस्टिक बंदीमुळे “पॅकींग’साठी मोठ्या अडचणी उद्‌भवल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)