जिहे-कठापूर योजना सर्वशक्तीनिशी पूर्ण करणार

खटाव : चंद्रकांतदादा पाटील आणि गिरीष महाजन यांचे पुष्पहार देवून स्वागत करताना शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर, अनिल देसाई, दिलीप येळगावकर, मकरंद देशपांडे, महेश शिंदे आदी मान्यवर.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा शब्द : स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचेच योजनेला नाव

कोरेगाव, दि. 30 (प्रतिनिधी) – जिहे-कठापूर जलसिंचन उपसा योजना आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू स्व. लक्ष्मणराव इनामदार आता यांच्या नावाने ओळखली जाणार आहे. त्यांचा नावाला कमीपणा येवू न देण्यासाठी येणाऱ्या दीड वर्षात या योजनेसाठी लागणारा संपूर्ण निधी देवून योजना सर्व शक्तीनिशी मार्गी लावू, असा निर्धार जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. दरम्यान, आघाडी सरकारच्या नेत्यांनी जुन्या योजना रखडवून नवीन कामांना मंजूरी देवून कोट्यवधींचे कमिशन मिळवले असल्याचा घणाघात त्यांनी केला.
खटाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भाजपतर्फे महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष खा. संजय काका पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, आमदार दिलीप येळगावकर, मकरंद देशपांडे, महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. महाजन म्हणाले गुरूवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार या खटावच्या सुपूत्राने केलेल्या सुस्कांरामुळे देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने जागतिक नेता मिळाला. कायमस्वरूपी दुष्काळी छायेतील माण आणि खटाव तालुक्‍यातील सुमारे 70 हजार हेक्‍टर शेतीला कायम स्वरूपी पाणी मिळावे म्हणून 1995 सेना-भाजप युती शासनाने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून 269 कोटींचा आर्थिक निधी मंजूर करून जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या कामास सुरूवात केली. मार्च 1999 अखेर धरणाची कामे पूर्ण करून पाणी अडवण्याचे काम पूर्ण झाले. 1999 मध्ये युतीची सत्ता आली असती तर खटावच्या माळावर कुसळाऐवजी हिरवीगार शेती दिसली असती. 1999 पासून 2014 पर्यंत सत्तेवर राहिलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीने शासनाने निधी अभावी जिहे-कठापूर योजने सारख्या अनेक जल सिंचन योजना रखडवल्या. काही निधीअभावी बंद केल्या. उलट 15 वर्षांच्या सत्तेच्या काळात मागील जलसिंचन योजना अपूर्ण ठेवून 50 हजार कोटींच्या नवीन कामांना मंजूरी देवून त्यामधून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी कोट्यवधी रुपयांचे कमीशन मिळवले, असा घणाघात ना. महाजन यांनी केला.
जिहे-कठापूर योजनेवर आजअखेर 375 कोटी खर्च झाले असून उरलेले 850 कोटी दीड वर्षात शासनाकडून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे माण-खटाव तालुक्‍यातील 70 हजार हेक्‍टर शेतीला पाणी मिळणार असून माण, खटाव तालुक्‍याचा दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मुबलक पाणी आणि वीज मिळाल्यास शेतीमालाचे उत्पन्न वाढते. उत्पादित शेतीमालाला चांगला भाव मिळाला तर कर्जमाफीची गरज उरणार नाही. शासनाने नुकताच एक निर्णय घेतला असून शेतीच्या एकूण वीज बिलापैकी 81 टक्के वीज बिल शासन भरणार आहे. केवळ 19 टक्के वीज बिलच शेतकऱ्याला भरावे लागणार असल्याचे ना. महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.
ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, स्वामीनाथन आयोगाने शिफारशी केलेल्या शेतीमालाच्या हमीभावाच्या बहुतांशी मागण्या केंद्र आणि राज्य शासनाने पुर्ण केल्या आहेत. जनतेच्या हिताच्या अनेक योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे विरोधक सैर भैर झाले आहेत. एकत्रित निवडणूक लढवण्याच्या भाषा बोलू लागले आहेत. मात्र जनता आता कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या भुलथापांना बळी पडणार नाही. घोडेमैदान लांब नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने वेगवेगळे लढून दाखवावे. असे आव्हान ना. पाटील यांनी दिले.
ना. शेखर चरेगावकर, संजय काका पाटील, दिलीप येळगावकर, अनिल देसाई, महेश शिंदे, भरत आमोळकर यांची भाषणे झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निष्क्रिय नेत्यांना घरी बसवा
मुंबईत राहायचे, व्यवसाय-उद्योगधंदे मुंबईत करायचे आणि नेतृत्व कोरेगाव विधानसभा मतदार संघात करायचे. आमच्याकडे सहा महिने जनतेच्या प्रश्नाकडे पाठ दाखवणाऱ्या नेत्याला लगेच हद्दपार करतात. परंतु कोरेगाव विधानसभा मतदार संघात सहा-सहा महिने न फिरकता विकास न करता जनता शशिकांत शिंदे यांना निवडून देते. त्यांना निवडून देणारी जनता कशी आहे हे पाहण्यासाठी मुद्दाम मी या मेळाव्यास उपस्थित राहिलो आहे. ही परिस्थिती आता बदलुन निष्क्रीय नेत्याला घरी बसवा. महेश शिंदेंसारख्या जनतेच्या प्रश्नासाठी कायम सक्रिय असणाऱ्यास साथ द्या, असे आवाहन ना. महाजन यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)