जिहे-कठापूरला मान्यता द्या, अन्यथा कार्यालये पेटवणार

नरेंद्र पाटील यांचा इशारा: आज केंद्रिय जलआयोगाची बैठक
सातारा- जिहे-कठापूर योजनेला मंगळवारी होणाऱ्या जलआयोगाच्या बैठकीत मान्यता मिळाली नाही तर कृष्णा खोरे महामंडळाची कार्यालये पेटवणार असल्याचा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला.

सोमवारी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी इशारा दिला. त्यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, प्रताप जाधव, भानुदास कोरडे, सचिन झणझणे, निलेश देवकर, महिपतराव डंगारे, आमिन मुबारक आगा, संजय नलावडे, प्रा.सुधाकर फडतरे आदी.उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, जिहे-कठापूर योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी यापुर्वी शिवसेने वर्धनगड बोगद्यात आंदोलन केले होते. आंदोलनाला आ.शशिकांत शिंदे, कॉंग्रेसचे सुरेश जाधव यांच्यासह शेतकरी संघटना व पाणी चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला होता. त्यावेळी जलसंपदा अधिक्षक विजय घोगरे यांनी आश्‍वासन देत बंद पडलेले काम सुरू झाले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पुढाकाराने सेनेच्या खासदारांनी दिल्लीत पाठपुरावा करत केंद्रिय जलआयोगाने जिहे-कठापुर योजनेला मान्याता देण्याची मागणी केली होती. त्यावर आयोगाने पुढील बैठकीत मान्यता देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी दिल्लीत जलआयोगाची बैठक होत आहे. बैठकीच्या विषय पत्रिकेवर जिहे-कठापूर योजनेला मान्यता देण्याचा विषय घेण्यात आला आहे. मात्र, जर बैठकीत मान्यता देण्याचे टाळले तर कशाची ही पर्वा न करता शिवसेना पोलीस व प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यालय पेटवणार आहे.

कारण, जिहे-कठापूर ही एकमेव योजना आहे ती दोन्ही सरकारने कायम दुर्लक्षित ठेवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आम्हाला शासनाचे पाणी ही नको आणि लाभ क्षेत्रात जलसंपदाच्या एका ही अधिकाऱ्याने फिरकायचे नाही अशी भूमिका घेत पुढील दिवसात लाभ क्षेत्रामध्ये अफु व गांजाची लागवड करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे, असे पाटील यांनी शेवटी सांगितले.

 लक्ष्मणशास्त्री इनामदार लॉ कॉलेज उभारा
जिहे-कठूापर योजनेला भाजपचे महेश शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, महेश शिंदे यापुर्वी सत्ताधारी पक्षामध्ये होते. त्यांना अत्ताच योजनेची आठवण का झाली. यापुर्वी त्यांनी योजनेला केंद्राचा निधी मंजूर झाल्याचे सांगत फटाके फोडले होते. मात्र, खरेच भाजपने योजनेला निधी मंजूर केला तर आम्ही महेश शिंदेंची वाजत गाजत मिरवणूक काढू आणि त्यापुढे जावून भाजपने सांगितले तर सेना त्यांच्या विरोधात उमेदवार देखील उभा करणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. तसेच योजेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू व खटाव तालुक्‍याचे लक्ष्मणशास्त्री इनामदार यांचे नाव देण्याबाबत पाटील म्हणाले, इनामदार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते उत्तम वकील होते. त्यामुळे त्यांच्या नावाने खटाव तालुक्‍यात लॉ कॉलेज काढण्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत असे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)