जिल्ह्यासाठी “मागेल त्याला शेततळे’ योजना ठरली पथदर्शी

जिल्हा कृषी विभाग : योजनेत जिल्ह्याची राज्यात आघाडी : 36 कोटी 88 लाखांचे अनुदान वितरीत
 कर्जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी घेतला सर्वाधिक लाभ
नगर – राज्य शासनाने शाश्‍वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी “मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्हा कृषी विभागाला राज्यात सर्वाधिक 9 हजार 200 चे उद्दिष्ट दिले होते. त्यात कृषी विभागाने 100 टक्के उद्दिष्टपूर्ती केली असून, 36 कोटी 88 लाख अनुदान वितरीत केले आहे. कृषी विभागाने या योजनेत राज्यात आघाडी घेतली असल्याचे शासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले असून, त्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लागल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात राज्य शासनाने जिल्हा कृषी विभागाला 8 हजार 500 शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यात कृषी विभागाने ते वाढवून घेऊन 9 हजार 200 शेततळ्यांचे उद्दिष्ट घेतले. हे राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक उद्दिष्ट होते. त्यात 33 हजार 885 एकूण अर्ज आले होते. शासनाने शेततळ्यांसाठी 14 हजार 187 कामांना कार्यारंभ आदेश दिलेले आहे. उद्दिष्टाच्या दीडपट शेतकऱ्यांना कृषी विभागाने शेततळे दिले आहे. या योजनेत आखणी करून दिलेली शेततळे संख्या 13 हजार 141 आहे. प्रत्यक्ष 767 शेततळ्यांची कामे सुरू असून, 8 हजार 99 शेततळे पूर्ण झालेले आहेत. आजमितीस 7 हजार 688 शेततळ्यांचे अनुदान वितरीत केले आहे. 2016-17 ते 2017-18 या वर्षात शेततळ्यांसाठी एकूण 36 कोटी 88 लाखांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. “मागेल त्याला शेततळे’ योजनेत राज्यात आघाडी घेतली असून, जिल्हा कृषी विभागाचे हे मोठे यश आहे.
या योजनेसाठी शेतकऱ्यांच्या नावावर किमान 0.60 हेक्‍टर क्षेत्र असावे. शेतकऱ्यांची जमीन तांत्रिकदृष्या पात्र असणे आवश्‍यक राहील. यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खचरासोबत तयार होणारी बोटी या घटकांचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा. या योजनेत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी दारिद्रयरेषेखाली व आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसा ज्येष्ठतासूचीनुसार करण्यात येते. शेततळ्यासाठी जमिनीचा सात-बारा व 8 “अ’ उतारा, तसेच दारिद्रयरेषेखालील कार्ड, आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसाचा दाखला आवश्‍यक आहे.
शेततळे करण्यासाठी रोजगार हमीद्वारे शेततळे, एनएचएम योजनेद्वारे शेततळे व “मागेल त्याला शेततळे’ अशा योजना आहेत. यातील “मागेल त्याला शेततळे’ योजनेचा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. कृषी विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आल्याप्रमाणे “मागेल त्याला शेततळे’ योजनेमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासोबत रब्बी व उन्हाळी पिके घेणेदेखील शक्‍य झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले.
“मागेल त्याला शेततळे’ योजनेचा सर्वाधिक लाभ कर्जत 1 हजार 547 व त्याखालोखाल श्रीगोंदा तालुक्‍यात 947 शेततळ्यांचा गावांतील शेतकऱ्यांनी घेतला आहे. जिल्ह्यात एकूण 6 हजार 378 शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा लाभ घेतला असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. शेततळ्यांमुळे भविष्यात शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होणार असून, शेतीसाठी पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास बहुतांशी मदत झाली असून, उत्पन्नातही वाढ झाली आहे.
“मागेल त्याला शेततळे’ ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक असली तरी एका शेततळ्यासाठी दोन ते अडीच लाख इतका खर्च येत असताना शासनाकडून केवळ 50 हजार रुपये इतके अनुदान मिळते. त्यामुळे प्रसंगी शेतकऱ्यांना कर्जही काढावे लागते.
कोट…
शाश्‍वत सिंचनाचा पर्याय म्हणून “मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या योजनेत मोठे सहकार्य मिळाल्याने ही योजना यशस्वी झाली आहे. नगर हा जागृत जिल्हा आहे. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, शेततळ्याला मंजुरी घेऊन काम सुरू करावे. शेततळ्यांसाठी एकूण 36 कोटी 88 लाखांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
पंडित लोणारे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
चौकट…
तालुकानिहाय अनुदान वितरीत केलेली संख्या
नगर-578, पारनेर-504, पाथर्डी-380, जामखेड-241, श्रीगोंदा-885, कर्जत-1284, नेवासा-300, श्रीरामपूर-312, शेवगाव-180, राहुरी-240, संगमनेर-888, राहाता-440, कोपरगाव-632, अकोले-746 असे एकूण 7 हजार 610 शेततळ्यांचे अनुदान वितरीत झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)