जिल्ह्यात 22 नवे करोनाबाधित

जिल्ह्यातील रुग्णसंख्या 538; तिघांचा मृत्यू, 237 जण निगेटिव्ह, 233 जण विलगीकरण कक्षात

सातारा – जिल्ह्यात सोमवारी 22 रुग्णांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 538 झाली आहे. जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृत्यूपश्‍चात स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 14 जणांना विलगाकरीण कक्षात दाखल केले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 538 करोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 179 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर 338 रुग्णांवर उपचार सुरु असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील विविध करोना केअर सेंटर व उपजिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या 17 जणांचे करोना रिपोर्ट सोमवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आले, तसेच मुंबईवरुन आलेल्या व घरीच क्वारंटाइन असेलल्या भोगाव (ता. वाई) येथील रक्तदाबाचा त्रास असलेल्या 85 वर्षीय महिला, सारीचा आजार असलेली गिरवी (ता. फलटण) येथील 65 वर्षीय महिला तर 15 वर्षापूर्वी कॅन्सरने आजारी असलेला 29 मे रोजी मुंबई येथून आलेला 52 वर्षीय पुरुष अशा 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूपश्‍चात त्यांच्या घाशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. संध्याकाळी निष्पन्न झालेल्या बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्‍यातील बरड येथील 55 वर्षीय महिला, वडले येथील 35 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्‍यातील कावडी येथील 52 वर्षीय महिला, कळकोशी येथील 41 वर्षीय पुरुष, केळघर (सोळशी) येथील 39 वर्षीय महिला, कराड तालुक्‍यातील विंग येथील 43 वर्षीय महिला व 19 वर्षीय तरुण, पाटण तालुक्‍यातील काळेवाडी येथील 21 वर्षीय महिला, नवसरेवाडी येथील 25 व 22 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्‍यातील शिरवळ येथील 72 वर्षीय महिला, खटाव तालुक्‍यातील अंभेरी येथील 3 व 6 वर्षीय बालिका व 29 वर्षीय पुरुष, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील हरचंदी येथील 53 वर्षीय महिला व गोरोशी येथील 72 वर्षीय महिला, वाई ग्रामीण रुग्णालयातील 24 वर्षीय महिला आरोग्य सेवक अशा 17 जणांचा समावेश आहे.

त्यापूर्वी सोमवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये पाटण तालुक्‍यातील नवसरवाडी येथील 1 (60 वर्षीय पुरुष), वाई तालुक्‍यातील ओहळी येथील 1 (42 वर्षीय पुरुष) व जांभळी येथील 1 (11 वर्षीय मुलगी), महाबळेश्‍वर तालुक्‍यातील कोट्रोशी येथील 1 (10 वर्षीय मुलगी) व हरचंदी येथील 1 (63 वर्षीय पुरुष) अशा एकूण पाच रुग्णांचा रिपोर्ट करोनाबाधित आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. महाबळेश्‍वर तालुक्‍यातील झांजवड येथील 57 वर्षीय पुरुष, पाथरवाडी (ता. कराड) येथील 33 वर्षीय पुरुष व सातारा शहरातील बुधवार पेठेतील 65 वर्षीय महिला, अंबेदरे आसरे (ता. वाई) येथील 43 वर्षीय महिला तसेच उंब्रज (ता. कराड) येथील 60 वर्षीय पुरुषाचा अशा एकूण 5 जणांचा मृत्यूपश्‍चात घेतलेल्या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील रांजणी (ता. जावळी) येथून आलेल्या 85 वर्षीय मृत महिलेचा मृत्यूपश्‍चात नमुना तपासणीकरिता पुणे येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. पुण्यातील एन.सी.सी.एस. यांनी रविवारी रात्री उशिरा 228 जणांचे व कृष्णा मेडिकल कॉलेजने 9 जणांचे अशा एकूण 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 14 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस. यांच्याकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 31, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 52, कृष्णा कॉलेजमधील 42, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 14, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 6, खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयातील 29, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 33 व रायगाव येथील 26 असे एकूण 233 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी. सी. एस. व कृष्णा मेडिकल यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये आज तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 3 मृत व्यक्तिंच्या घशातील स्त्रावांचाही समावेश असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यात दिवसभरात 35 रुग्ण करोनामुक्त झाल्याने दिलासा
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असलेले पाच, कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमधील पाच, रायगावच्या करोना सेंटरमधील दोन व खावलीतील चार अशा आणखी 16 करोनामुक्‍त रुग्णांना सोमवारी घरी सोडण्यात आले. त्याशिवाय कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून सोमवारी 19 जणांना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे दिवसभरात एकूण 35 करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.